Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राजीनाम्याची आवृत्ती : पवारच नव्हे तर बाळासाहेबांसह सोनिया गांधींनीही दिला होता राजीनामा

राजीनाम्याची आवृत्ती : पवारच नव्हे तर बाळासाहेबांसह सोनिया गांधींनीही दिला होता राजीनामा

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक बॉम्बस्फोट आणि खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण पक्षासह कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील भावूक झाले होते. शरद पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू देखील दाटून आले होते. परंतु शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी सुरू केली आहे. परंतु शरद पवारांचा निरोप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे कार्यकर्त्यांसमोर गेले होते. कार्यकर्त्यांना घरी जाण्याचं आवाहन हे शरद पवार यांच्याकडून करण्यात आलं.

शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु याआधी सुद्धा अशाच प्रकारचे अनेक प्रसंग घडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तसेच २००४ साली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी संसदीय नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी राजीनामे मागे घ्यावेत यासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर अनेक कार्यकर्ते भावूक झाले होते.

- Advertisement -

१९७८ च्या काळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पराभवानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. मनपा निवडणूक हारलो तर शिवसेनापदाचा राजीनामा देणार असं बाळासाहेबांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर मुंबईतील एका जाहीर सभेत बाळासाहेबांनी शिवसेनापदाचा राजीनामा दिला होता.

बाळासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिकांना मोठा धक्का बसला, त्यांनी राजीनाम्याला विरोध केला आणि बाळासाहेबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. परंतु कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर बाळासाहेबांवर घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यानंतर होणाऱ्या आरोपावरुन बाळासाहेबांनी १९८९ साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ‘जय महाराष्ट्र’ लिहित राजीनामा देत असल्याचे संकेत दिले होते. परंतु शिवसैनिकांनी ‘मातोश्री’बाहेर तुफान गर्दी केली आणि साहेब असं काही करू नका, अशी साद घातली होती. त्यानंतरही बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागे घेतला होता.

- Advertisement -

१७ मे १९९९ साली झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. पण नंतर शरद पवार, संगमा आणि तारिक अन्वर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि सोनिया गांधी यांचा राजीनामा परत घेण्यात आला. तसेच २००४ साली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचे सरकार सत्तेत आलं. एकीकडे सोनिया गांधीच देशाच्या पंतप्रधान होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र, त्यांच्या विदेशीपणाच्या मुद्यावरून राजकारण तापवलं जात होतं. सोनिया गांधींनी शेवटी आपण पंतप्रधान होणार नाही असं जाहीर केलं आणि आपल्या संसदीय पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीही पक्षाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सोनिया गांधी यांनी राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी करू लागले होते. पण सोनिया गांधींनी आपण पंतप्रधान होणार नसल्याचं स्पष्ट करत विरोधकांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यातील हवाच काढून घेतली होती.

दरम्यान, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तर महाविकास आघाडीचं आता काय होणार असा प्रश्न पडला आहे. परंतु येत्या तीन दिवसांत पवार आपला राजीनामा मागे घेणार का?, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा प्रयत्न, प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका


 

- Advertisment -