शिवसेनेच्या ‘त्या’ 16 आमदारांना पुन्हा नोटीस, सोमवारपर्यंत उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा दावा केला होता.

notice issued to shiv sena mlas by assembly vice president narhari jirwal

आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. यात बंडखोरी आमदारांवर आता कारवाई करण्यास शिवसेनेने सुरु केली आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी पुन्हा एकदा 16 बंडखोर शिवसेना आमदारांना आज पुन्हा नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसीत आमदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही स्थितीत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिंदे गटात सहभागी झालेले हे बंडखोर आमदार यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीमधील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये आहेत. यामुळे 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची विनंती शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी आमदारांना नोटीस बजावल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभु यांनी एक व्हीप जारी केला होता. त्यानुसार सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी पक्षादेश पाळला नाही. त्यामुळे या आमदारांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जावी असे मागणी पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवण्यात आले होते. त्यानुसार आता उपाध्यक्षांनी 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच ईमेल आणि पत्राच्या माध्यमातूनही या नोटीसला उत्तर देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. जर आमदारांकडून नोटीसाला काहीच उत्तर आले नाही त त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा दावा केला होता. मात्र नरहरी झिरवळांविरोधातील अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे झिरवळांना 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठवण्याचे नैतिक अधिकार आहे. त्यानुसार या आमदरांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण या राजकीय परिस्थितीमुळे भाजपसह महाविकास आघाडी सरकारच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सामंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.


 

स्वतंत्र शिंदे गटाला लवकरच नवीन नावाने मान्यता, 3 जुलैला नवं सरकार येणार-सूत्र