घरउत्तर महाराष्ट्रनियमबाह्य फी घेणार्‍या ४ महाविद्यालयांना नोटिसा

नियमबाह्य फी घेणार्‍या ४ महाविद्यालयांना नोटिसा

Subscribe

कायद्याची पायमल्ली : आठ दिवसांत खुलासा करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे महाविद्यालयांना आदेश

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गठीत केलेल्या चौकशी समितीने जिल्ह्यातील २० महाविद्यालयांमध्ये जाऊन नियमबाह्य फी व डोनेशबाबत चौकशी केली असून, त्यात महाविद्यालयांनी शासकीय नियमांना फाटा देत मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केल्याचे उघडकीस आले आहे.

छात्रभारतीय विद्यार्थी संघटनेने उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करीत असल्याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे दाखल केली होती. त्यानुसार सहायक संचालक लिंबाजी दौलत सोनवणे यांच्या चौकशी समितीने न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे वैनतेय विद्यालय, निफाड, सुखदेव माध्यमिक विद्यामंदिर व ज्यू. कॉलेज, इंदिरानगर, भोंसला मिलिटरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि व्ही. एन. नाईक महाविद्यालयाची चौकशी करून अहवाल सादर केला. अहवानानुसार चार महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने चार महाविद्यालयांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित का करण्यात येऊ नये. याप्रकरणी ८ दिवसांत खुलासा करावा, असे आदेश शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिले आहेत.

- Advertisement -

व्ही. एन. नाईक महाविद्यालय

 • सहायक संचालक लिंबाजी दौलत सोनवणे यांच्या चौकशी समितीने क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची ९ ऑगस्ट २०२३ रोजी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
 • विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.
 • २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीतील प्रत्येक शैक्षणिक वर्षांत पालक शिक्षक संघ आणि पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या इतिवृत्ताच्या नोंदी विहित नमुन्यात ठेवल्या नाहीत. शुल्क निर्धारणासाठी प्रस्ताव सादर केला नाही.
 • २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची स्थापना झाली असली तरी इतिवृत्त नोंदवहीत नाही. इतिवृत्त त्रोटक असल्याचेही समोर आले आहे.
 • २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात २६ ऑगस्ट २०२३ रोजी पाल सभा घेऊन पालक शिक्षक संघाची कार्यकारी समिती गठीत केलेली नाही. कार्यकारी समितीने एकही बैठक घेतली नाही.
 • शासनाने शुल्क दर निश्चित केले असतानाही प्राचार्यांनी नियमबाहय शुल्क आकारलेले आहे.
 • २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील प्रत्येकी दोन तुकड्यांना ४० टक्के आणि विज्ञान शाखेच्या तिसर्‍या तुकडीला २० टक्के अनुदान मंजूर झालेले आहे. तरीही, नियमबाह्य शुल्क आकारण्यात आले आहे.

सुखदेव विद्यामंदिर व कॉलेज

 • सहायक संचालक लिंबाजी सोनवणे यांच्या चौकशी समितीने इंदिरानगरमधील सुखदेव विद्यालयाची २६ सप्टेंबर २०२३ रोजी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
 • शाळा व्यवस्थापनाने २०२३-२४ मध्ये अकरावीमध्ये नियमानुसार प्रवेश क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. पालक शिक्षक संघ व पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या इतिवृत्ताच्या नोंदवह्या अवलोकनासाठी दिल्या नाहीत.
 • नमूद शुल्कांचा तपशील विचारात न घेता शुल्क वसूल करण्यात आले आहे. अनुदानित तत्वावरील तुकडीतील विद्यार्थ्यांकडून फी चे दर निश्चित केले असतानाही मुख्याध्यापकांनी नियमबाह्य शुल्क आकारले.
 • २०२३-२४ चा पालक शिक्षक संघ गठीत नाही. १५ ऑगस्टपर्यंत सभा घेतलेली नाही. कार्यकारी समिती कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे एकही बैठक नाही.

भोेंसला स्कूल व कॉलेज

 • सहायक संचालक लिंबाजी दौलत सोनवणे यांच्या चौकशी समितीने सेंटल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे भोंसला मिलिटरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजची १७ ऑगस्ट २०२३ रोजी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
 • शासन शुल्क निश्चित करत असतानाही अनुदानित कला व वाणिज्य शाखेतील अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून २ हजार ६८५, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून २ हजार ७४५, विज्ञान शाखेतील अकरावीतील विद्यार्थ्यांकडून ६ हजार २८५, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ६ हजार ३१५ रुपये बेकायदेशीर वसूल करण्यात आले आहेत.
 • पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या सहविचार सभेमध्ये शुल्क निश्चित केले नाही.
 • विनाअनुदानित वर्गासाठी विज्ञान शाखेतील अकरावी आणि बारावी शैक्षणिक शुल्क पालक शिक्षक संघ अणि पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या इतिवृत्ताची नोंदवही अवलोकनासाठी दिली नाही. त्यामुळे मूळ ठरावाची नोंद शाळा व्यवस्थापनाने शुल्क निर्धारणासाठी प्रस्ताव सादर केला नसल्याचे समोर आले आहे.
 • नमूद शुल्कांचा तपशील विचारात न घेता शुल्क वसूल करण्यात आले आहे. २०२३-२४ चा पालक शिक्षक संघ गठीत केलेला नाही. शिवाय, १६ ऑगस्टपर्यंत एकही सभा घेतली नाही.
 • अकरावीच्या विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक ठेवलेले नाही. दररोज हजेरी घेण्यात आलेली नाही. विनाअनुदानित वर्गासाठी ३ पूर्णवेळ, ४ अर्धवेळ, ५ घड्याळी तासिका शिक्षक याप्रमाणे पदे मंजूर आहेत. हजेरीपटानुसार १८ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, हजेरीपटावर पूर्णवेळ, अर्धवेळ, घड्याळी तासिका शिक्षक उल्लेख नाही. २०१९-२० मधील विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत ११ डिसेंबर २०१९ पूर्वी करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांचे पत्र आणि स्मरणपत्र दिले असतानाही कोणतीही कार्यवाही केली नाही.

वैनतेय विद्यालय व कॉलेज, निफाड

 • सहायक संचालक लिंबाजी सोनवणे यांच्या चौकशी समितीने न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वैनतेय विद्यालयाची ११ ऑगस्ट २०२३ रोजी चौकशी करून अहवाल सादर केला. अहवानानुसार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
 • शाळा व्यवस्थापनाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावीमध्ये नियमानुसार क्षमतेपेक्षा १८२ जादा प्रवेश व बारावीमध्ये ८१ जादा प्रवेश नियमबाह्य दिल्याचे दिसून आले आहे. अकरावीमध्ये विज्ञान शाखेची विनाअनुदानित तत्वावरील दुसरी तुकडी सुरु करण्यास मान्यता मिळणेबाबत प्रस्तुत कार्यालयात प्रस्ताव सादर केला आहे.
 • तुकडी मान्यता नसताना २०२३-२४ मध्ये नियमबाह्य जादा प्रवेश दिल्याचे दिसून आले आहे. २०२१-२२ मधील पालक-शिक्षक संघ आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या इतिवृत्ताची नोंदवही अवलोकनासाठी देण्यात आली नाही. त्यामुळे ठरावाची नोंद शाळा व्यवस्थापनाने शुल्क निर्धारणासाठी सादर केलेला प्रस्ताव दिसून आला नाही.
 • शुल्काचा तपशील विषद केला नसून एकत्रितपणे इतर फी असे म्हणून शुल्क वसूल केले. पावती मात्र पालकांच्या नावे देणगी म्हणून देण्यात आली. २०२३-२४ चा पालक शिक्षक संघ स्थापन केलेला नाही. १५ ऑगस्टपर्यंत सर्वसाधारण सभा घेतली नाही. विद्यार्थी हजेरीपत्रक नसल्याने दैनंदिन उपस्थिती व अनुपस्थितीची नोंद नाही.
 • अनुदानित तत्वावरील तुकड्यांवरील विद्यार्थी हजेरीपत्रक विहित नमुन्यात ठेवले नाही.
 • विनाअनुदानित तत्वावरील शिक्षकांचे हजेरीपटावरून फक्त एकमेव शिक्षक शिरीष पंडीत यांची नियुक्ती केली.
 • शिक्षक हजेरीऐवजी शाळेने विनाअनुदानित उच्च माध्यमिक वर्गासाठी शिकवणार्‍या शिक्षकांचे रजिस्टर स्वतंत्र ठेवले असून, त्यावर कर्मचार्‍यांचे पदनामाचा उल्लेख केलेला नाही. ही आक्षेपार्ह व संशयास्पद असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
 • न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाने १८ जणांना नियुक्ती आदेश दिले नाहीत. अनुदानित तत्वावरील तुकडीतील विद्यार्थ्यांकडून शुल्क दर निश्चित असतानाही मुख्याध्यापकांनी ५५० रुपये शुल्क नियमबाह्य आकारले आहे.

बेकायदेशीररित्या शुल्क वसुली करणार्‍या नाशिक जिल्ह्यात २० महाविद्यालयांची चौकशी करावी, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्याकडे जुलै २०२३ मध्ये केली होती. त्यानुसार १३ महाविद्यालयांची चौकशी पूर्ण झाली असून, ४ महाविद्यालयांचा चौकशी अहवाल छात्रभारतीला प्राप्त झाला आहे. उर्वरित महाविद्यालयांची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण उपसंचालक यांना केली आहे. महाविद्यालयांनी शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे अन्यथा, संबंधित महाविद्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

– समाधान बागूल, राज्य कार्याध्यक्ष, छात्रभारती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -