घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना नोटीस

नाशिकमध्ये निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना नोटीस

Subscribe

खुलाश्याने समाधान न झाल्यास त्यांना पुढील ६ वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाण्याची शक्यता बळावली आहे.

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देवूनही दिलेल्या मुदतीत खर्च सादर न करणार्‍या जिल्ह्यातील दोन उमेदवारांना जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजावून खुलासा मागवला आहे. मात्र या खुलाश्याने समाधान न झाल्यास त्यांना पुढील ६ वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाण्याची शक्यता बळावली आहे.

अन्यथा कारवाई होणार

२१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातून १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर ३० दिवसांत उमेदवारांनी आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यात खर्च सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सर्व उमेदवारांना २३ नोव्हेंबरपर्यंत खर्च सादर करण्याची मुदत देण्यात आली. मात्र दिलेल्या मुदतीत नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवार महेश आव्हाड, आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गोविंद बोराळे यांनी खर्च सादर केला नसल्याची माहिती लेखा व कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे यांनी दिली. त्यानुसार या उमेदवारांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. मुदतीत खर्चाचा तपशील सादर न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये अपात्रतेबाबत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या उमेदवारांना देण्यात आलेल्या नोटीसीनंतर प्राप्त खुलाश्यातून प्रशासनाचे समाधान न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक पूर्व आणि नांदगाव मतदारसंघातील दोन उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना नोटीसा देवून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा निवडणुक अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येईल. तेथून तो खुलासा आयोगाकडे पाठविण्यात येईल. खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल.
विलास गांगुर्डे, लेखा कोषागार अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -