मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची, त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्ही सुद्धा मासे खा म्हणजे तुमचेही डोळे सुंदर होतील, असे विधान आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी केले आहे. यावरून ठाकरे गटाने आता वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव सामील झाल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – “महाराष्ट्रातील राजकारणात कबड्डी सुरू”, जितेंद्र आव्हाडांची सरकारवर निशाणा
नंदुरबारमधील भाजपा आमदार विजयकुमार गावित हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. मासेमारी करणाऱ्यांना साधनसामुग्रीचे वाटप करण्यासाठी धुळ्यामध्ये आयोजित कार्यक्रमात विजयकुमार गावित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थिताना मासे खाण्याचे फायदे सांगतांना त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला.
विजयकुमार गावित म्हणाले की, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस म्हणजे बाईमाणूस चिकने दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घेणार. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, ती बंगळुरूला समुद्रकिनारी राहायची. त्यामुळे ती दररोज मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत. माशांमध्ये तेल असते. माशांच्या तेलामुळे डोळ्यांना आणि त्वचेला चांगला फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे- संजय राऊत यांना जामीन
वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरुषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजपा नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागली आहे. भक्त आणि उठसूठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या, प्रत्येकवेळी महिला अत्याचारावर (सोयीस्कर) भूमिका घेणाऱ्या भाजपाच्या मंडळींचे कान मात्र असली विधाने ऐकताना बधिर होतात, असे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले…
विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी आजपासून मासे खायला सुरुवात करत आहे. गावित यांनी नवीन शोध लावला आहे, गावित हे डॉक्टर आहेत ना, तो त्यांनी काही नवीन शोध लावला आहे. गावित यांनी अभ्यासवर्ग घ्यावेत, मुले येतील, पोरी कशा पटवाव्यात, असा त्यांचा सल्ला असेल. मंत्री आहेत चांगले सल्ले देतात, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.