आता मुख्यमंत्री, पंतप्रधानही थेट निवडा; अजित पवार यांचा सरकारला खोचक सल्ला

ज्याप्रमाणे सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे आता राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानही थेट जनतेतून निवडून द्या, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी दिला.

संग्रहित छायाचित्र

ज्याप्रमाणे सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे आता राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानही थेट जनतेतून निवडून द्या, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी दिला. थेट सरपंच निवडीला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता. युती सरकारने केलेला निर्णय महाविकास आघाडीच्या काळात बदलण्यात आला होता. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचा कोल्हापुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. (Now elect Chief Minister Prime Minister also directly Ajit Pawar advice to the government)

नवनियुक्त सरपंचांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, तुम्हाला संधी मिळाली आहे. तुम्ही थेट लोकांमधून सरपंच झाला आहात. हा ठराव करत असताना आम्ही विरोध केला होता. थेट सरपंच करता, मग थेट पंचायत समितीचा सभापती करा. थेट नगराध्यक्ष करता, मग थेट महापौर करा. नगराध्यक्षही जिल्ह्याने निवडू द्या. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्याने निवडू द्या, देशाचा पंतप्रधान देशाला निवडू द्या.

ठराविक ठिकाणी लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडणार, मुख्यमंत्री आमदारांतून निवडणार, पंतप्रधान खासदारांतून निवडणार हे कसे चालेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सगळ्यांना सारखा अधिकार दिला आहे. त्यामध्ये बहुमताला जास्तीत जास्त महत्त्व दिले आहे. काही ठिकाणी असे होते की सरपंच होतो एका विचारांचा आणि समिती असते दुसर्‍या विचारांची. म्हणजे विरोधी पक्षांची. सरपंच कोणता ठराव करायला गेला की समिती विरोध करते आणि समितीने काही सांगितले की सरपंच विरोध करतो.

अक्षरशः ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो, पण कायदाच झाला आहे, यदाकदाचित त्यांची समिती वेगळ्या विचारांची असेल तर निवडणुका तेवढ्यापुरत्या ठेवा, तुम्हाला गावचे कारभारीपण मिळाले आहे. त्यामुळे गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करा. ज्या उद्देशाने तुम्हाला निवडून दिले आहे, तिथे वाद घालता कामा नये, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.


हेही वाचा – हा दागिना ‘सराफा’च्या घरीच मिळू शकतो, राज ठाकरेंची ‘अशोक पर्वा’त कोटी