घरमहाराष्ट्रआता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनातही माँ जिजाऊंची प्रतिमा!

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनातही माँ जिजाऊंची प्रतिमा!

Subscribe

मुंबई : राजमाता माँ जिजाबाई शहाजी भोसले यांच्या ४२५व्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात जिजाऊंची प्रतिमा लावत नवा आदर्श निर्माण केला. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाऊच असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेचे बीज या मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरले. अशा जिजाऊंना ४२५ व्या जयंतीनिमित्त राज्याचा प्रमुख या नात्याने शतशः प्रणाम, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिजाऊंना गुरुवारी अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमा आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनात माँ जिजाऊंचे छायाचित्र लावून त्यांना जयंतीनिमित्त आगळेवेगळे अभिवादन केले आहे. सध्या राज्यात संभाजीराजे धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन वाद निर्माण केले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठेही गाजावाजा न करता जिजाऊ यांची प्रतिमा आपल्या दालनात लावून एक नवा आदर्श निर्माण केल्याची चर्चा मंत्रालयात होती. दरम्यान, जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा महासंघांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

तत्पूर्वी, राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच, मंत्रालयातील अॅनेक्स इमारतीच्या तळमजल्यावरही जिजाऊंच्या प्रतिमेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना राज्यपालांचे अभिवादन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी राजभवन येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्यपालांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पाजंली अर्पण करून अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -