मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘विदूषक’ म्हणून उल्लेख केला होता. त्यावरून ठाकरे गट आणि चित्रा वाघ यांच्यात शब्दरण रंगले आहे. ठाकरे गटाने चित्रा वाघ यांच्यावर आक्रमकपणे टीका केली होती. त्याला आता चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिल आहे.
विदुषकांना विदूषक म्हंटलं की फार येतो राग
कपाळावरची शीर उडते नि अंगाची होते आगआम्हाला आता शिकवू लागलात तुम्ही नैतिकता
पण खरंच उद्धवजी,दिसता कसे तुम्ही आरशात स्वत: ?अडीच वर्षांत तुम्ही पाहिले नाही कधी मंत्रालयाचे दार… pic.twitter.com/ehn8XB0VJp
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 15, 2023
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना टरबुज्या असा उल्लेख केला होता. तर, चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर विदूषकासारखी वेळ आली असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे आपला पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा यात आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. त्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. काय ग विचित्राबाई, किती वेळा रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा, असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले होते.
संजना घाडी यांनी अनके मुद्दे उपस्थित करत चित्रा वाघ यांची एकाच प्रकरणावर बदलत गेलेली भूमिका अधोरेखित केली आहे. तसे ट्वीटही त्यांनी केले. या ट्वीटमध्ये घाडी यांनी संजय राठोड, धनंजय मुडे, गुलाबराव पाटील या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवरील वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केले होते.
हेही वाचा – ‘इंडिया’ हिंदू आणि सनातन धर्माविरोधी – निर्मला सीतारामन
त्यावर पुन्हा चित्रा वाघ यांनी ट्वीट करत, ‘विदुषकांना विदूषक म्हटलं की फार येतो राग, कपाळावरची शीर उडते नि अंगाची होते आग..’ असे म्हणत पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचले आहे. आम्हाला आता शिकवू लागलात तुम्ही नैतिकता, पण खरंच उद्धवजी, दिसता कसे तुम्ही आरशात स्वत:? आता कशाने फुटलाय घाम आणि कानांना बसलीय दडी, जास्त जोरात लागते काय आमचीदेखील शाब्दिक छडी? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.