ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं बेईमानी; अजित पवारांची शिंदे सरकारवर जहरी टीका

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णयाची वाट बघत बसू नका तयारीला लागा असे आवाहन आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे

npc leader ajit pawar maha vikas aghadi upcoming election allegation on cm eknath shinde bjp at shirdi

शिर्डी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात त्यातून आमदार, खासदार तयार होतात. हेच लोक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणारे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे निवडून आणावी असे सांगतानाच पक्षाकडून निर्णय येईल याची वाट बघत बसू नका. निर्णय येईल तेव्हा येईल तोपर्यंत स्वतंत्र लढायचं आहे त्यादृष्टीने कामाला लागा असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी शिंदेसरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला. (npc leader ajit pawar maha vikas aghadi upcoming election allegation on cm eknath shinde bjp at shirdi)

सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे ही जनभावना अजित पवार यांनी यावेळी सांगितली.

निवडणूकांना विलंब हे लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य

लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम होतेय परंतु ते कधीही यशस्वी होणार नाही. सर्व निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे परंतु निवडणूकांना विलंब लावला जात आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणूका वेळेत होणे याकडे राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे त्यांची ती जबाबदारी आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन 

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन आपण हे शिबीर करत आहोत. येणाऱ्या भविष्यात पक्षाने काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे, कोणत्या पध्दतीने काम केले पाहिजे. पक्षाची पुढची वाटचाल ठरवण्यासाठी हे शिबीर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाच निवडणूका होत आहेत. याबाबत सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन चर्चा करण्यात आली आहे. या निवडणूका आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. या पाचही जागा आघाडीच्या कशा येतील त्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

सरकारकडून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न

बच्चू कडू यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून पद मिळवले ठीक आहे परंतु पक्षावर दावा करणे योग्य नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राक्षसी महत्वाकांक्षा योग्य नाही. मोठे प्रकल्प आणणे त्यांना जमणार नाही. वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे अशी टीकाही अजित पवार यांनी केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत त्यातून लाखो नोकर्‍या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत. मात्र सरकार याचे लंगडे समर्थन करताना दिसत आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.

सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू

चार लाख कोटी एवढी गुंतवणूक राज्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र आता महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प गेला हे धांदात खोटं बोलत आहेत. अंगलट आल्यावर दिल्लीला जातो आणि प्रकल्प घेऊन येतो सांगत आहेत. मात्र यांच्यामुळेच बेकारी वाढत आहे. नोकर्‍यांवर गंडांतर येत आहे. हे सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहेत. ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सध्या सरकारचा सुरू आहे अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली.

हे सरकार जितका काळ सत्तेत तितकी बेकारी, बेरोजगारी वाढणार

महाराष्ट्राचे प्रकल्प बाहेर जात आहेत. यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प गेले हे शिंदे सरकारचे अपयश आहे. हे सरकार जितका काळ सत्तेत राहिल तितकी बेकारी, बेरोजगारी राज्यात वाढणार आहे असेही अजित पवार म्हणाले.

यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करा सांगून तो जाहीर केला नाही. विम्याची भरपाई द्या अशी मागणीही केली आहे. मात्र १३ कोटी जनतेचे हे दूर्देव आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा : पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, आरोपीस अटक