राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २६ वर, शनिवारी ९ रुग्णांची भर!

राज्यात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आता हा आकडा २६वर गेला आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आता महाराष्ट्रात आहेत.

Coronavirus in Italy
कोरोना व्हायरस

जगभरात हौदोस माजविणार्‍या करोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे. राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता २६ वर पोहोचली असून शनिवारी यवतमाळ येथे दोघांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघंही जण गेल्या काही दिवसांपूर्वी दुबईतून परतले होते. त्यावेळी त्यांना ही लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी आढळून आलेल्या ९ रुग्णांपैकी १ जण महिला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असले तरी शनिवारी यवतमाळ मधील दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी नोंद झालेल्या ९ रुग्णांपैकी ४ जण हे पुणे येथील पहिल्या २ बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी १ रुग्ण अहमदनगरला, २ यवतमाळला आणि १ जण मुंबईत भरती आहे.

राज्यात एकूण २६ रुग्ण करोनाची लागण झालेले आढळले आहे. यात पुणे १०, मुंबई ५, कामोठे पनवेल १, नवी मुंबई १, कल्याण १, ठाणे १, यवतमाळ २, नगर १ आणि नागपूरमध्ये ४ असे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यभरातील शाळा-महाविद्यालयं ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजेश टोपे, आरोग्यमंत्री

या चौघांशिवाय मुंबईत आणखीन ४ जण करोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदुजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे ३७ आणि ५९ वर्षांचे पुरुष आहेत. त्यांनी अनुक्रमे अमेरिका, फ्रान्स आणि फिलिपाईन्सला प्रवास केला आहे. तर नागपूर येथे भरती असलेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक ४३ वर्षीय पुरुष ही करोना बाधित असल्याचा अहवाल शनिवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे. तर राज्यात आज १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

संशयितांचा पाठपुरावा सुरू

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून करोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राज्यात नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेड्स उपलब्ध आहेत. १२ मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणार्‍या देशांतून आलेल्या इतर प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिारी दिली.


हेही वाचा – राज्यातील शाळा, कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी!