घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'नजर महानगर'ची : नाशिक जिल्ह्यात कृषी पर्यटनाला बहर, हजारो पर्यटकांची रेलचेल, रोजगार...

‘नजर महानगर’ची : नाशिक जिल्ह्यात कृषी पर्यटनाला बहर, हजारो पर्यटकांची रेलचेल, रोजगार निर्मिती

Subscribe

विभागात ३८ कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून जपली जातेय ग्रामीण संस्कृती

मनीष कटारिया । नाशिक

ग्रामीण धाटणीचा पाहुणचार, नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या वस्तू, झोपडी, फळबागा, बैलगाडीची सफर, ग्रामीण पध्दतीने बनविलेले रूचकर पदार्थ, शेतीचे धडे… या सर्व गोष्टी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवता येतात. कृषी पर्यटनामुळे अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होत आहे. शेती आणि पर्यटनाच्या संगमातून केवळ रोजगार संधीच निर्माण होत नाहीत तर ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला चालना मिळते. शहरापासून जवळच असलेल्या या कृषी पर्यटन केंद्रामुळे पर्यटक प्रदुषणमुक्त नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊन पुन्हा ताजेतवाने होत आपल्या शहराकडे जाऊ शकतात. कृषी पर्यटनामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

 

नाशिक शहरानजीक तसेच, जिल्ह्याच्या विविध भागांत कृषी पर्यटन केंद्रे बहरत आहेत. नाशिकचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास धार्मिक पर्यटन हा पाया आहे. त्याच्याशी निगडित कृषी पर्यटन अर्थात, वाईन टुरिझमचा नवा सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. ‘वाईन कॅपिटल’ म्हणून नाशिकचा विकास होण्यामागे येथील वातावरण युरोपशी साधर्म्य आहे, हे प्रमुख कारण आहे. युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक वायनरी आहेत. तेथील वातावरण आणि नाशिकचे हवामान जवळपास सारखेच असल्यामुळे नाशिकला वाईनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या जोडीला ‘वाईन टुरिझम’ हे अलिकडच्या काळात विकसित झालेले पर्यटनाचे क्षेत्र आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण, मुबलक पाणी, धरणांचा जिल्हा, गिर्यारोहकांना खुणावणारे गड, किल्ले, धबधबे, पुरातन मंदिरे अशा अनेक गोष्टींचे वरदान नाशिकला लाभले असून, शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीसोबतच कृषी पर्यटन धोरण स्विकारले आहे. म्हणूनच नाशिकला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

निसर्गाच्या प्रेमात पर्यटक

शेतामधील साधे, शांत घर, आजूबाजूला द्राक्ष शेती, दारात वेगवेगळ्या फुलांची झाडे, त्या झाडांवर चिवचिवाट करणारे पक्षी आणि चुलीवर तयार होणारे गरमागरम जेवणाची पर्यटकांना भुरळ पडते. त्यामुळे उन्हाळ्यात शहरातील मंडळी कृषी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हमखास येतात. इथे आल्यावर नदीत डुंबणे, बैलगाडीतून रपेट , ग्रामीण खाद्य संस्कृतीचा आनंद पर्यटकांना भुरळ घालते.

मामाचा मळा ते बर्ड पार्क

संस्कृती अ‍ॅॅग्रो टुरिझम संचालित मामाचा मळा हे नाशिकमधील प्रसिध्द कृषी पर्यटन केंद्र. ७ एकरमध्ये वसलेल्या या केंद्रात विविध प्रकारची वृक्षराजी दिसते. त्याचबरोबर जुनी विहीर, शेततळे असा देखावा कोकणवाडी येथे केला आहे. निर्मल कृषी पर्यटन येथे नाशिकमधील पहिले बर्ड पार्क असून, स्थानिक आणि परदेशी पक्ष्यांच्या सुमारे २०० प्रजातींच्या हजारो पक्ष्यांचे निवासस्थान आहे. अंजेनेरी येथे चाणक्य कृषी पर्यटन केंद्र येथे पर्यटकांसाठी जंगल सफारी, पक्षी निरीक्षण, वनस्नान, योग आणि ध्यान केंद्रासारख्या सुविधा आहेत.

गावरान मिसळचा झटका

नाशिकला आले अन् मिसळचा आस्वाद घेतला नाही असा व्यक्ती सापडणे दुर्मिळ. नाशिक म्हणजे मिसळप्रेमींचे माहेरघर. येथील चुलीवरची झणझणीत मिसळ, सेंद्रिय गुळाची जिलेबी, केसर बाग, द्राक्षबाग, पेरूच्या बागेत मिसळ पाव, भाकरी, महाराष्ट्रीयन थाळी आणि ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आनंद देणारी बरीच ठिकाणे आहेत. यापैकी अनेक ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात बसून जेवणाचा आनंद तर आहेच शिवाय पर्यटकांसाठी बैलगाडी सवारी, घोडे सवारी असे बरेच काही समाविष्ट आहे.

कृषी पर्यटनाचा उद्देश

  • शेतीपूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे
  • शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे
  • ग्रामीण भागातील लोककलेचे जतन करणे
  • स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे
  • शहरी लोकांना शेती आणि संबंधित व्यवसायाची माहिती देणे
  • प्रदूषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवणे
  • ग्रामीण भागातील पडीक, गायरान क्षारपड जमिनी उपयोगात आणणे
  • पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीकामाचा अनुभव देणे

कृषी पर्यटनासाठी निकष

  • कृषी पर्यटन केंद्र हे शहरापासून किमान ५ किलोमीटर बाहेर असावे.
  • केंद्र सुरू करण्यासाठी कमीत कमी ५ एकर व त्यापेक्षा जास्त शेती असणे आवश्यक
  • २४ तास पाण्याची सुविधा असणे आवश्यक
  • पर्यटकांसाठी उभारण्यात येणारया खोल्या पर्यावरणपुरक उदा. बांबु, झोपडीवजा असाव्या
  • कृषी पर्यटप केंद्राकरीता महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल.
  • पर्यटन केंद्र चानवणारी व्यक्ती शेतकरी असावा
  • पर्यटन निवासस्थान हे शेतीच्या ठिकाणीच असणे बंधनकारक आहे.
  • पर्यटन संचालनालयाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • वैद्यकिय सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रथमोपचार पेटी केंद्राच्या ठिकाणी ठेवाव्यात.

कृषी पर्यटन खालील घटक सुरू करू शकतात

  1. वैयक्तिक शेतकरी
  2. कृषी सहकारी संस्था
  3. शेतकर्‍यांच्या सहकारी संस्था
  4. अशासकीय संस्था
  5. कृषी विज्ञान केंद्र
  6. कृषी महाविद्यालये
  7. कृषी विद्यापीठे
  8. शेतकर्‍यांनी स्थापन केलेल्या भागीदारी संस्था किंवा कंपनी

कृषी पर्यटनासाठी शासनाकडून मिळणारे लाभ

  • पर्यटन केंद्राच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे कर्ज प्राप्त करता येते.
  • पाणलोट आधारित योजना, शेततळे सारख्या योजनांना प्राधान्य देण्यात येईल.
  • नोंदणीकृत केंद्रांना ग्रीन हाउस, फळबाग, भाजीपाला लागवड सारख्या योजना उपलब्ध करून दिल्या जातील.
आदर्श केंद्राकरीता ऐच्छिक बाबी
  1. पर्यटन केंद्राच्या ठिकाणी गर्द झाडी, नद्या, नाले आसपास असावे.
  2. एकाचवेळी विविध पीक पध्दतींचा अवलंब केला गेला असावा.
  3. पर्यटकांसाठी घरघुती पध्दतीची रूचकर भोजन व्यवस्था.
  4. ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी शेतीतील विविध हंगामातील कामे दाखवण्याची सोय असावी
  5. विटीदांडू, हुतूतू, लंगडी, झोका इ. ग्रामीण खेळ खेळण्याची सुविधा असावी.

व्यवसायातील संधी

  • स्थानिक हस्तकला शेती उत्पादनावरील प्रक्रिया व त्यांची विक्री
  • हरिगृह दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय रोपवाटिका कुक्कुटपालन व्यवसाय
  • शेळीपालन मेंढीपालन पशुपालन
  • ग्रामीण फेरफटका साहसी पर्यटन

कृषी पर्यटनाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना विविध करांतून सूट देण्यात आली आहे. शेतीसाठी ज्या सुविधा शासनाकडून दिल्या जातात त्याच धर्तीवर कृषी पर्यटनासाठीही दिल्या जातात. नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असल्याने नाशिक विभागात कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. विभागात ३८ कृषी पर्यटन केंद्र आहेत यातील बहुतांश केंद्र ही नाशिक जिल्ह्यात आहेत. दरवर्षी सुटीच्या कालावधीत मोठया संख्येने पर्यटक या कृषी केंद्रांना भेटी देत असतात. : मधुमती सरदेसाई-राठोड, उपसंचालक, पर्यटन विभाग, नाशिक

सध्याची शेतीची परिस्थिती पाहता शेतीमालाला भाव नाही, अवकाळीचे संकट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना एक चांगले माध्यम उपलब्ध झाले आहे. आगामी काळात पर्यटनवाढीच्या दृष्टीने या क्षेत्रात चांगला वाव आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकर्‍यांनी कृषी पर्यटनाकडे वळावे. : दिग्विजय मानकर, संचालक संस्कृती अ‍ॅग्रो टुरिझम

नाशिक जिल्ह्याला निसर्ग सौंदर्यतेचा वारसा लाभलेला आहे. एप्रिल, मे महिना वगळता आल्हाददायक वातावरण असते. यामुळे नाशिकमधील कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून गाव शिवारात दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्पनाशक्तीला वाव देत स्वतःचे विश्व निर्माण करता आले याचे समाधान लाभले. पर्यावरण पूरक जीवन जगताना आनंदी वातावरणता रोजगानिर्मिती केली. : रमेश मोगल, कृषी पर्यटन चालक डिलिजन्स फार्म

कृषी पर्यटन केंद्रासाठी ८२ अर्ज

कृषी पर्यटन केंद्रासाठी ८२ अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३८ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. २२ अर्ज हे नामंजूर करण्यात आले. इतर अर्जांच्याबाबतीत कागदपत्रांची पुर्तता करण्यात येत आहे. ३८ पैकी नाशिकमध्ये २५, अहमदनगर जिल्हयात ८, जळगाव ३, धुळे जिल्हयात २ केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -