इलाखा शहरसाठी अभियंत्यांमध्ये जबरदस्त चढाओढ; कार्यकारी पदासाठी आठ अधिकारी स्पर्धेत

mantralay

 

मुंबईः सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई इलाखा शहर विभागाच्या कार्यकारी अभियंता पदासाठी अधिकाऱ्यांमध्ये जबरदस्त चढाओढ लागली आहे. या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी तब्बल आठ अधिकाऱ्यांनी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण चक्रावून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी यासंदर्भातील नियुक्तीचा प्रस्ताव तूर्त बाजूला ठेवल्याचे समजते.

मुंबई इलाखा शहर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर नाईक हे नियत वयोमानानुसार येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. नाईक यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच या पदावर आपल्याला संधी मिळावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून इच्छुक अधिकारी कामाला लागले आहेत. या पदासाठी सरकारमधील तीन मंत्र्यांनी वेगवेगळ्या नावांची शिफारस केली आहे. याशिवाय विभागातील काही वजनदार अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील अभियंत्यांची नावे रेटली आहेत. त्यामुळे इलाखा शहर कार्यकारी अभियंता पदाच्या नियुक्तीचा गुंता वाढला आहे.

मंत्रालय, विधान भवन, नवीन प्रशासकीय भवन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी यांची शासकीय निवासस्थाने, मुंबई उच्च न्यायालयाची वास्तू, मुंबई पोलीस आयुक्तालय आदी सर्वच महत्वाच्या शासकीय वास्तूंची देखभाल दुरुस्ती तसेच नव्या वास्तूंच्या उभारणीची जबाबदारी इलाखा शहर विभागावर आहे. त्यामुळे या विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आजच्या घडीला जवळपास आठ अधिकाऱ्यांनी या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील उमेश झगडे, पुण्याचे प्रशांत पाटील, नांदेड जिल्ह्यातील संदीप कोटलवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील संदीप पाटील, पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले विद्याधर पाटसकर, अंधेरी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन धात्रक, नवी मुंबईतील नितीन बोरोले आणि वरळी दुग्धशाळेत कार्यरत असलेल्या स्वाती पाठक यांचा समावेश आहे.

इलाखा शहर कार्यकारी अभियंता पदासाठी चाललेली चुरस लक्षात घेऊन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सध्यातरी या पदावरील नव्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली असून ऐनवेळी नव्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील एकात्मिकृत घटक विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष माने हे सुद्धा येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे इलाखा शहर विभागात संधी मिळणार नसेल तर एकात्मिकृत घटक विभागात नियुक्ती मिळावी, असा काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

मंत्र्यांचा पत्रप्रपंच
दरम्यान, इलाखा शहर कार्यकारी अभियंता पदासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उमेश झगडे यांची तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सचिन धात्रक यांच्या नावाची शिफारस केली आहे. एमएसआरडीसीतील संदीप पाटील यांच्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिफारस पत्र दिल्याचे समजते. तर संदीप कोटलवार यांच्यासाठी विदर्भातील एक मंत्री प्रयत्नशील असल्याचे कळते.