श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लवकरच ऑफलाईन पास

पासचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

saibaba-temple

शिर्डी – श्री साईबाबांच्या दर्शनासाठी ऑफलाईन पास व्यवस्था सुरू होणार असुन, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. ऑफलाईन पाससह भक्तांसाठी प्रासादालयदेखील सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बानायत यांनी सांगितलं.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ७ ऑक्टोबरपासून राज्यातली धार्मिक स्थळ खुली करण्यात आली. त्या अनुषंगाने शिर्डीचे साई मंदिरही नियम अटींसह भाविकांना दर्शनासाठी सुरू करण्यात आल. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार साई दर्शनासाठी ऑनलाईन पास बंधनकारक करण्यासोबतच दररोज फक्त १५ हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आलीय. ऑनलाईन पास बंधनकारक असल्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी साई संस्थानला प्राप्त झाल्या होत्या.

कोरोना संसर्ग कमी झाल्यानं अधिकाधिक भाविकांना साईबाबांचं दर्शन मिळावं यासाठी साई संस्थानने ऑनलाईन पास व्यतिरिक्त ऑफलाईन पास व्यवस्था सुरू करण्यासाठी व दर्शन मर्यादा वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर साईबाबा संस्थानचे प्रसादालय पूर्ववत सुरू करण्यासाठीदेखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. शासनाची मंजुरी येताच लगेचच त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असं बानायत यांनी स्पष्ट केलं.

पासचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा

ऑनलाईन पासच्या नावाखाली अनेकांनी काळाबाजार सुरू केल्याचं काही घटनांवरून निदर्शनास आलंय. संस्थानने पासचा गैरव्यवहार करणाऱ्या ५ जणांवर कारवाई केली आहे. आस्थेचा फायदा घेऊन काही असामाजिक तत्वांकडून भाविकांची फसवणूक केली जात असून, असे उद्योग तत्काळ बंद करावेत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. – भाग्यश्री बानायत, सीईओ, साईबाबा संस्थान शिर्डी