Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रOil Reserve : महाराष्ट्रातील सागरी कक्षेत सापडले तेलाचे साठे, असा होणार फायदा

Oil Reserve : महाराष्ट्रातील सागरी कक्षेत सापडले तेलाचे साठे, असा होणार फायदा

Subscribe

पालघर : महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतेच अरबी समुद्रात पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशालाही याचा मोठा फायदा होणार आहे. या नवीन सापडलेल्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे भारतीय तेल उत्पादनात सक्षम होण्याची नवी आशा आता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनात हे साठे सापडले असून त्याठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Oil Reserve found in the arabian sea near sindhudurg and palghar maharashtra)

हेही वाचा : Satish Bhosale : बसने प्रयागराजला गेला, तिथूनही पसार होण्याच्या तयारीत अन्…; खोक्या ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात 

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन तेल साठे पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील तसेच सिंधुदुर्गातील मालवणजवळील समुद्रात आहेत. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5,338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13, 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संशोधन आणि उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठयामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे.

कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. दरम्यान, मुंबईच्या समुद्रात जवळपास 75 सागरी मैल अंतरावर 1974 मध्ये बॉम्बे हाय येथे खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. महाराष्ट्राशी निगडित दोन्ही साठे उथळ समुद्रातील असून त्यांचे अंतर किनाऱ्यापासून 86 सागरी मैलापर्यंत आहे. या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे.