घरमहाराष्ट्रRaigad ST Accident : दूरच्या मार्गावर दामटवल्या जातात भंगार बस!

Raigad ST Accident : दूरच्या मार्गावर दामटवल्या जातात भंगार बस!

Subscribe

मिरज-श्रीवर्धन एसटी बसच्या अपघातानंतर लांबच्या पल्ल्यासाठी एसटी महामंडळाकडून भंगार गाड्या का सोडल्या जातात, प्रवाशांच्या जीवाशी का खेळ केला जातो, असे सवाल उपस्थित होत आहेत.

श्रीवर्धन : येनकेन प्रकारे श्रीवर्धनमधील एसटी डेपो अनेकदा चर्चेत राहिले आहे. दूरच्या मार्गावर भंगार बस पाठवण्यात येत असल्याचा कळीचा मुद्दा मिरज-श्रीवर्धन बसला झालेल्या अपघातानंतर ऐरणीवर आल्याने हा डेपो चर्चेत आला आहे.
मिरजहून सकाळी ७ वाजता सुटणार्‍या आणि बोर्ली पंचतनमार्गे येणार्‍या या बसला सोमवारी सायंकाळी वडवली फाट्याजवळ अपघात झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस १० फूट खड्ड्यात कोसळली. बसमध्ये ३४ प्रवासी होते. यापैकी काहींना किरकोळ दुखापती झाल्या. या बसचा प्रवास महाड, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराडमार्गे मिरज असा असतो. यातील महाबळेश्वरपासून पोलादपूरपर्यंतचा मार्ग घाट रस्त्याचा असल्याने धोकादायक समजला जातो. स्वाभाविक या मार्गावर सुस्थितीतील बस सोडणे क्रमप्राप्त असताना चक्क भंगार झालेली बस पाठवली जाते.

हेही वाचा… Raigad Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

- Advertisement -

मात्र श्रीवर्धन आगाराकडून मिरज मार्गाप्रमाणेच अन्य लांबच्या मार्गावरही जुन्या आणि शब्दशः डब्बा झालेल्या बसेस दामटवण्यात येत असतात. याबाबत प्रवाशांची नेहमी ओरड होत असली तरी आगारप्रमुखांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.

अलीकडेच श्रीवर्धन आगारामध्ये काही नवीन बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी दोन बस श्रीवर्धन-मिरज-श्रीवर्धन मार्गावर चालवणे गरजेचे असताना दोन्ही बाजूने जुन्या बस धावत आहेत. वारंवार दुरुस्ती कराव्या लागणार्‍या जुन्या बस लांबच्या आणि घाट रस्त्यावरील प्रवासासाठी का पाठवल्या जातात, असा सवाल यातून उपस्थित झाला आहे. मिरज-श्रीवर्धन बसचा घाटात अपघात घडला असता तर मोठा अनर्थ अटळ होता. प्रवाशांच्या सुदैवाने किरकोळ अपघातावर निभावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या

सध्या आगारात वापरल्या जाणार्‍या लाल रंगाच्या बसेस या अगोदर नीमआराम (एशियाड) बस होत्या. नीमआराम बसला काही वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यावर लाल रंग लावून ‘साधी’ म्हणून ही बस वापरण्यात येते. आगाराकडून मुंबई, बोरिवली, ठाणे, भाईंदर या मार्गावर नवीन बस चालवल्या जातात. या शहरांचे अंतर श्रीवर्धनपासून साधारण २०० ते २२५ किलोमीटरच्या आसपास आहे. परंतु ३१८ किलोमीटर अंतर असणार्‍या मिरज मार्गावर नेहमीच जुनी बस देण्यात येत असते. या मार्गावर प्रवाशांना नवीन बसची प्रतीक्षा आहे.

ओव्हरटेकचा प्रयत्न आणि…

बस वेगात असताना चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून वाहन आले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस बाजूच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यावेळी बसची स्प्रिंग तुटली.

– मेहबूब मणीयार, एसटी आगारप्रमुख, श्रीवर्धन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -