घरमहाराष्ट्रBMC २७ हजार महिलांना स्‍वयंरोजगारासाठी देणार आर्थिक मदत

BMC २७ हजार महिलांना स्‍वयंरोजगारासाठी देणार आर्थिक मदत

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नियोजन विभागाच्या माध्यमातून सामाजिक कल्याणाच्या योजनांसाठी यंदा सुमारे सहा पटीने आर्थिक तरतूद वाढवून २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये महिलांना अर्थसहाय्य योजनेसाठी तब्बल १०० कोटी रुपये तरतूद केली आहे.

मुंबई | बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नियोजन विभागामार्फत महिलांना स्‍वयंरोजगारासाठी विविध योजना राबविण्‍यात येतात. याचाच एक भाग म्हणून पात्र ठरलेल्‍या २७ हजार महिलांना (Women) शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप (Masala Kandap) आदी संयंत्र सामुग्रीसाठी अर्थसहाय्य प्रदान करण्याचा शुभारंभ राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्‍या हस्‍ते उद्या सायंकाळी ५ वाजता सोमय्या मैदान, चुनाभटटी येथे होणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्‍ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्‍हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास तथा मुंबई उपनगर जिल्‍हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, स्‍थानिक खासदार  राहूल शेवाळे,  स्‍थानिक आमदार  मंगेश कुडाळकर, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, इतर लोकप्रतिनिधी आदी मान्‍यवरांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे समारंभाचे अध्‍यक्षस्थान भूषवतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी दिली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि सहआयुक्‍त (मध्‍यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार,  सहायक आयुक्‍त (नियोजन)  प्रशांत सपकाळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली नियोजन विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्‍यात येत आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जसे की, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्या सामाजिक कल्याणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. महिलांचा जीवनस्तर उंचावणे व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी महानगरपालिका नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, विकास कामांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग लाभावा, यासाठी जेंडर बजेट अंतर्गत निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये, योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणाऱया महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदी करता यावी म्हणून अर्थसहाय्य देण्यात येते. त्याचा शुभारंभ उद्या होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू महिलांना घरघंटी, शिवणयंत्र, मसाला कांडप यंत्र अशा प्रकारच्या विविध यंत्रसामुग्री खरेदीसाठी हे अर्थसहाय्य पुरवण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नियोजन विभागाच्या माध्यमातून सामाजिक कल्याणाच्या योजनांसाठी यंदा सुमारे सहा पटीने आर्थिक तरतूद वाढवून २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये महिलांना अर्थसहाय्य योजनेसाठी तब्बल १०० कोटी रुपये तरतूद केली आहे. निराधार, दुर्बल घटकातील उच्च शिक्षण घेणाऱया मुली व महिला यांना परदेशी शिक्षणासाठी व्हिजा तसेच अन्य परवान्याकरिता अर्थसहाय्य, महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-बाईक व मालवाहक ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य, जिल्हास्तरीय खेळाडू एकरकमी प्रोत्साहन अशा योजनांचाही यामध्ये समावेश आहे.
विकासकामांना चालना देताना गरजू सामाजिक घटकांसाठी अर्थसंकल्पात न्याय्य वाटा ठेवून त्याची अंमलबजावणी आर्थिक वर्षात झाली पाहिजे, याकडे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा कटाक्ष आहे. नियोजन विभागाची वाटचाल आता एका नवीन पर्वाकडे होत आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -