त्र्यंबक रोडवरील बेकायदेशीर लॉजिंगमुळे परिसरात मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले असून, मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. लॉजिंग बाहेर बसलेल्या काही मंडळींकडून मुली आणि महिलांची छेड काढली जात असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. शिवाय, परिसरातून जाणार्या मुली आणि महिलांना हातवरे करून लॉजमध्ये येण्याचे इशारे केले जातात. त्यामुळे येथील महिला व मुली त्रस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांना देखील याच प्रकारचा सामना करावा लागतो. या मुली बस स्टॉपवर उभे राहिल्या तरी लोक त्यांच्याकडे संशयाने बघत असल्याने अनधिकृत लॉजिंग हटवावेत अशी मागणी पुढे आली आहे.
त्र्यंबक रस्त्यावरील लॉजिंगचा प्रश्न परिसरातील गावकर्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. एकट्या – दुकट्या महिलेला त्रंबक रोड वरून जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागते. या रस्त्यावरून कुटुंबीयांसमवेत जाणे देखील मुश्किल आणि धोकेदायक वाटत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. लेकीबाळींना दुचाकीवरून घेऊन जाताना लॉजिंग बाहेर बसलेल्या काही टवळखोरांकडून वाईटसाईट इशारे केले जातात. काही ठिकाणी शिट्ट्या मारून आतमध्ये येण्याचा आग्रह केला जातो. शाळा आणि कॉलेजमध्ये जाणार्या अनेक विद्यार्थिनींना या टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो. अगदी बस स्टॉपवर उभे राहून बसची वाट बघणे देखील येथे धोक्यात ठरू लागले आहे.
त्र्यंबक रस्त्यावरील पिंपळगाव बहुला, बेळगाव ढगा, महिरावणी या भागात सर्वाधिक लॉजिंग असून तळेगाव, खंबाळे, वाढोली, अंजनेरी तसेच पेगलवाडी फाटा यादरम्यानही लॉजिंग ची संख्या अधिक आहे. या गावांच्या बस स्टॉप वर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना टवळखोरांचा जाच सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील संदीप फाऊंडेशन,सपकाळ नॉलेज सिटी आणि ब्रह्मा व्हॅलीच्या विद्यार्थिनींना टवाळखोरांचा जाच सहन करावा लागत आहे. या विरोधात कुणी तक्रार केली तर गुंडगिरीचा सामना करावा लागत असल्याने पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस कुणीही करत नाही.
रस्त्यावरील आजूबाजूच्या गावातील काही नागरिकांनी अनधिकृत लॉजिंगच्या विरोधात आवाज उठवला; मात्र कालांतराने याच बहाद्दरांनी बहुतांश ठिकाणी अनाधिकृत लॉजिंग बांधून अनैतिक व्यवसायाला खतपाणी घातल्याचा आरोप केला जात आहे. या मंडळींना विरोध केला की गावकर्यांना धमकविले जात आहे. त्यामुळे अनधिकृत लॉजिंग जणू गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या पार्श्वभूमीवर एक तर सर्व लॉजिंग कायदेशीर करा नाहीतर एकदाचे बंद तरी करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नाशिक मधून मोठ्या प्रमाणावर जोडपे येत असतात. त्यात कमी वयाच्या मुले – मुलींची संख्या लक्षणीय असते. बहुतांश सर्वच मुली स्कार्फ बांधून येत असतात. त्यामुळे त्या ओळखू येत नाहीत. लॉज चालकांनी वयाचा पुरावा घेतल्याशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. प्रत्येक जोडप्याची रजिस्टरला नोंद घ्यावी.सर्वात महत्त्वाचे कॉलेजच्या मुला-मुलींना येऊ देणे बंद करावे. तसेच गैरप्रकार बंद करावे.
-संजय चव्हाण, स्थानिक नागरिक
त्र्यंबकेश्वर परिसरात इतक्या लॉजिंगची मूळात गरज आहे का? त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. त्याचं पावित्र्य जपणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. या तीर्थक्षेत्राचे रूपांतर भोगक्षेक्षेत्रात होत नाही ना ? याचा प्रत्येकाने विचार करावा. नाशिक ते त्र्यंबकेश्वर हायवे लगत काही शैक्षणिक संस्थांमध्ये शिकायला येणार्या नायजेरियन विद्यार्थ्यांचासुद्धा अनेकांना वाईट अनुभव आलेला आहे. केवळ पैसा मिळावा व ‘मला काय त्याचे?’ या भावनेने जर परमिट रूम व हॉटेल्स मालक वागत असतील तर संपूर्ण तरुण पिढी बरबाद करण्याचे महापाप त्यांच्या हातून घडते आहे.
प्रसाद धोपावकर, चिटणीस, मध्य मंडल भाजपा
प्रसाद धोपावकर, चिटणीस, मध्य मंडल भाजपा
लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या गैर प्रकारामुळे त्र्यंबकेश्वराचे नाव खराब झाले आहे. लॉजिंगची तपासणी झाली पाहिजे.गैरप्रकारांवर बंदी आणली पाहिजे. शाळकरी मुला मुलींवर त्याचे वाईट परिणाम होतात.बहुतांश लॉजिंग हे स्थानिक नागरिकांची असल्याने वादविवाद नको म्हणून कोणीही विरोध करत नाही.
गोटीराम कारंडे, शिवसेना पदाधिकारी, अंजनेरी
गोटीराम कारंडे, शिवसेना पदाधिकारी, अंजनेरी
पैसा कमावण्याच्या उद्देशाने काहीजणांनी बेकायदेशीर लॉज बांधले आहेत. लॉज चालकांनी येणार्या जोडप्यांना प्रतिबंध करावा. भाविकांना लॉज उपलब्ध करून देण्यास कुणाची काहीही हरकत नाही. मात्र गैरप्रकार थांबले पाहिजे.
-डॉ.अरुण चव्हाण,अंंजनेरी