पुणे : अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरात जाहीर सभा घेणार आहेत. कोल्हापूरकडे जाण्याआधी त्यांनी पुण्यात रोड शो करताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर ते कोल्हापूर-सातार मार्गाने कऱ्हाडला जाणार आहेत. मात्र कोल्हापूर दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी पुणे शहरात बॅनरबाजी करताना भावी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. याचपार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, बॅनर लावून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही त्यासाठी 145 चं मॅजिक फिगर असणं आवश्यक आहे. (One cannot become the future Chief Minister or Guardian Minister by putting up a banner Ajit Pawar spoke clearly)
कोल्हापूर दौऱ्यापूर्वी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अलीकडे महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री बॅनर लावण्याचं नवीन फॅड आलं आहे. राज्यात काही ठिकाणू राज ठाकरेंचे, पंकजा मुंडे यांचेही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीमागे कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईतही राष्ट्रवादी भवनच्या बाहेर जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि माझे बॅनर लावण्यात आले होते. पण अशाप्रकारची बॅनरबाजी करायला आम्ही सांगत नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
बॅनरबाजी करून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही, असे स्पष्ट सांगताना अजित पवार म्हणाले की, कोणाला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं असेल तर त्यासाठी 145 या मॅजिक फिगरचा आकडा गाठायला लागतो. जो हा आकडा गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो. जसं मागच्या वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गाठला होता, आता एकनाथ शिंदे यांनी गाठला होता, असं अजित पवार यांनी सांगतिलं
हेही वाचा – नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव; राजकीय नेते आता आंदोलकांच्या रडारवर
भाजपासोबत यायला उशीर झाला, असा प्रश्न अजित पवार यांना एका पत्रकाराने विचारल्यावर ते म्हणाले की, उशीरा येण्याचा प्रश्न नाही आणि तसं बोलणंही बरोबर नाही. कारण तो नशिबाचा भाग असतो. असं म्हणत अजित पवार यांनी फार बोलणं टाळलं.