घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआरोग्य केंद्रावर उपचाराअभावी एक दिवसाच्या बाळाचा मृत्यू; नाशिक शहरापासून काही किमीवरील घटना

आरोग्य केंद्रावर उपचाराअभावी एक दिवसाच्या बाळाचा मृत्यू; नाशिक शहरापासून काही किमीवरील घटना

Subscribe

नाशिक : तालुक्यातील चिखल-ओहळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक दिवसाच्या बाळाचा उपचारअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.६) सायंकाळी घडली. आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर हजर उपस्थित नसल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी संबधितांवर कारवाईची मागणी करीत आरोग्य केंद्रावर गर्दी केली होती.

मंगळवारी (दि.६) गावात शेतमजुरीसाठी आलेल्या सोनाली दिलीप शिंदे (वय ३५ रा. परभणी) या प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. सकाळी त्यांची प्रसूती सुखरूप पार पडली. बाळाची तब्येत देखील ठीक होती. दरम्यान दुपारी बाळाची तब्येत अचानक खालावल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्रावर डॉक्टर्स, नर्स किंवा इतर कर्मचारी उपलब्ध नव्हते. तब्बल एक तास बालकाला त्रास होत असतांना त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने ते दगावले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील कवीश्वर देशमुख, शिवाजी बोरसे, नितीन शिंदे, बाळासाहेब मगरे, राज देशमुख, शिवाजी पवार, ईश्वर चव्हाण, शांताराम खैरनार, राहूल देशमुख, प्रशांत देशमुख, नारायण खैरनार, अर्जुन भामरे, गोरख आहिरराव, नितेश देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावकरी संतप्त झाले होते.

- Advertisement -

बालकावर उपचार करण्यासाठी वेळीच डॉक्टर्स उपलब्ध नसल्यानेच उपचाराअभावी बालक दगावल्याचा आरोप बाळाची आई व ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. बालकाच्या मृत्यूचे कारण कळू शकले नसून रात्री उशिरा त्या बालकाचे शवविच्छेदन करण्यात येणार होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -