घरताज्या घडामोडीसंगमनेरमध्ये एक तर अकोलेत दोन रुग्णांची भर

संगमनेरमध्ये एक तर अकोलेत दोन रुग्णांची भर

Subscribe

जिल्ह्याचा आकडा शंभरीपार

गेल्या दोन दिवसांत दुपारपर्यंत नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०३ झाली असून दोन दिवसात संगमनेरमध्ये दोन तर अकोलेमध्ये तीन रुग्णांची भर पडली. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे मुंबईतून आलेले तीन रुग्ण बाधीत सापडल्याने तालुक्यातील रुग्णांची सहावर गेली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत संगमनेरमधील बाधितांची संख्या तीसवर गेली असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री नाशिकच्या अहवालात संगमनेरच्या घुलेवाडी भागातील एक डॉक्टर बाधित आढळला असून गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालात शहरातील भारतनगरमधील एक वृध्द बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरमधील कोरोनाचा सिलसिला अद्यापही सुरुच असून जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संगमनेरमध्ये आढळले आहेत. एका डॉक्टरपाठोपाठ आता वृध्दाला कोरोनाची बाधा झाल्याने संगमनेरकरांसमोरिल चिंतेत वाढ झाली आहे. शहरातील रुग्णाचा वाढता आलेख अद्याप थांबायला तयार नाही. बुधवारी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातून चार कोरोना संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी नगरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यात या वृध्दाला कोरोना असल्याचा अहवाल आला आहे. प्रशासनाने या वृध्दाच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरु केला आहे.

- Advertisement -

तर बुधवारी आढळलेल्या कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कातील ११ जणांना राजापुर, चिंचोली गुरव परिसरातुन तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. संबधित डॉक्टरवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर याशिवाय शहरातील आणखी दोन संशयितांनादेखील तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

सर्वजण मुंबई शहरातून गावाकडे 

अकोले तालुक्यातील सहा जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्वजण मुंबईसारख्या शहरातून गावाकडे आले होते. आत्तापर्यत कोरोनामुक्त असलेल्या अकोल्यात आता या बाहेरील पाहुण्यांमुळे कोरोनाने आपले पाय पसरले आहेत. सुरुवातीला लिंगदेव, नंतर ढोकरी, त्यापाठोपाठ समशेरपुर आणि बुधवारी रात्री पिंपळगाव खांड येथे बाधित रुग्ण आढळल्याने गुरुवारी त्यांच्या संपर्कातील बापलेकीला कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे निसर्ग संपन्न अकोले तालुकादेखील आता कोरोनाबाधित झाला असून चार दिवसात सहा रुग्ण आढळल्याने राजुर गुरुवारपासून पाच दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता अकोले शहरातदेखील शुक्रवारपासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

- Advertisement -

चार जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यातील चार रुग्ण गुरुवारी कोरोनामुक्त झाले. त्यात संगमनेर आणि पाथर्डीमधील प्रत्येकी एका तर नगरच्या सारसनगरमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यत जिल्ह्यातील ५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर जिल्ह्यात नव्याने चार कोरोनाबाधित आढळले असून त्यात संगमनेरमधील रुग्णाचा अद्याप समावेश झालेला नव्हता. तर अकोले तालुक्यात पिंपळगाव खांड येथे २ व नेवासे आणि श्रीगोंदे येथे प्रत्येकी एकेक कोरोनाबाधित आढळला आहे. जिल्ह्यातील ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -