नाशिक जिल्ह्यातून एक लाख कोटींची कृषी निर्यात शक्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; ‘सावाना’तर्फे कार्यक्रम संसद सदस्य पुरस्कार प्रदान

नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने शेतमालाचा खर्च वाचेल. तसेच ड्रायपोर्टमधून थेट बांगलादेशमध्ये शेतमाल जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक वाचनालय नाशिक(सावाना)तर्फे दिल्लीत गुरुवारी (दि.10) केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाईन पध्दतीने हा सोहळा पार पडला. शाल, स्मृतीचिन्ह, पुणेरी पगडी, ५० हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. खासदार सुभाष भामरे यांनी गडकरी यांना पुणेरी पगडी परिधान केली. तर खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंत्री गडकरी यांना येवल्याची शाल दिली. केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह भेट दिले. त्यानंतर खासदार गोडसे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी व्हिडीओकिल्पच्या माध्यमातून मंत्री नितीन गडकरींचा परिचय देण्यात आला.

केंद्रिय मंत्री गडकरी म्हणाले की, पुरस्कार दिल्याबद्दल सावानाचे मनापासून आभारी आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी नाशिकला येणार होतो. पण, कोरोना संकंटामुळे इच्छा असतानाही येता आले नाही. पुरस्कार व हार देणे हा न आवडणारा विषय आहे. ४० वर्षांत मंत्री, खासदार असताना स्वागताला कोणीही आलेले आवडले नाही. सत्कार कार्यक्रमाला जात नाही. आयुष्यात दोनदाच मनापासून हार खरेदी केले आहेत. पहिला हार अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरा हार १९६३-६४ साली लता मंगेशकर यांच्यासाठी हार घेतला होता. त्या नागपूरला आल्या असताना त्यांचे गाणं लोकांनी उधळले होते. आता नागपूरला येणार नाही, अशी लता मंगेशकर यांनी प्रतिज्ञा घेतली होती. त्यांना नागपूरला आणत त्यांचा मोठा नागरी सत्कार केला. त्यासाठी स्वत: मोठा गुलाबाचा हार घेतला होता. सत्कार व सन्मान हे होत असतात. पण सावानाची प्रथा व परंपरा वेगळी आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक नाशिकमध्ये अभ्यासिका आहेत. नाशिक सांस्कृतिकनगरी आहे. सावानाने सांस्कृतिक चळवळ अखंडपणे चालविली आहे. दिग्गजांनी नाशिकला समृद्ध केले आहे. मंत्री डॉ.पवार व खासदार गोडसे यांनी अभ्यास करुन एक पुरस्कार सुरु करावा. नाशिक द्राक्ष व कांदा निर्यात करणार्‍या नाशिक विभागातील २५ शेतकर्‍यांचा नागरी सत्कार करावा. कृषी क्षेत्रातले कौशल्य, तंत्रज्ञान व ज्ञान हे महाराष्ट्रात नाशिकमधून फैलावते.

खासदार गोडसे म्हणाले की, सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेस १८१ वर्षांचा इतिहास आहे. या संस्थेस स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, अटलबिहारी वाजपेयी यांनी सावानास भेट दिली आहे. सावानाचा सभासद असणे हा अभिमानाचा विषय आहे. यंदापासून प्रथमच स्व. माधवराव लिमये कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार दिला जात आहे. पुरस्कार निवड समितीने अध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे सुरुवातील हे काम अवघड वाटत होते. समितीने निकष समोर ठेवल्याने प्रथम केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे सुचले. त्यांनी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना उल्लेखनीय काम केले असून, आजही त्यांच्या कामांचा गवागवा होताना दिसत आहे. नितीन गडकरी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले आहे. केंद्रिय रस्तेविकास मंत्री म्हणून गडकरी यांनी देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यांचा आयुष्यभर कृतज्ञ आहे. ते धडाडीने व कल्पकतेने काम करत इतरांना प्रोत्साहन देत असतात. आज समाजात अनेक खासदार मंडळी मार्गदर्शक आहेत पण मेन्टॉर्स नाहीत. मंत्री गडकरी हे युवकांचे मेन्टॉर्स आहेत. त्यांना युवकांना मार्गदर्शन करुन आपल्या पायावर उभे केले आहे. ते युवकांना सांगतात की, पैसा जमा करण्यासाठी राजकारणात येऊ नका, हा संदेश युवा पिढीने अंमलात आणला तर राजकारणाचे शुद्धीकरण होईल आणि युवकांचे भले होईल.

यावेळी केंद्रिय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, माजीमंत्री सुभाष भामरे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, निवड समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत गोडसे, खासदार रक्षा खडसे, कार्याध्यक्ष संजय करंजकर, अ‍ॅड. अभिजित बगदे, धर्माजी बोडके, गिरीश नातू, डॉ. आर्चिस नेर्लीकर, सुरेश पाटील, प्रणव पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देवदत्त जोशी यांनी केले. प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविक केले.आभार ड. शंकर बोर्हाड़े यांनी केले

पुरस्काराची रक्कम केली परत

कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराचे ५० हजार रुपये आणि स्वत:चे ४.५० लाख रुपये असे एकूण ५ लाख रुपयांचा धनादेश देणार आहे. महाराष्ट्रातील आयआयटीन व इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घ्यावी. वेगळे मॉडेल तयार करा. जो दर्जेदार मॉडेल तयार करेल त्यास ५ लाखांचे बक्षीस द्यावे, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.