पुणे होर्डिंग दुर्घटना प्रकरण; होर्डिंग मालकाला अटक

पुणे होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता तर ७ जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आज होर्डिंग मालकाला अटक केली आहे.

pune accident
पुणे होर्डिंग अपघात

पुणे होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. होर्डिंगचा मालक अब्दुल मोहम्मद फकी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल फकी याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयिन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या होर्डिंगचे कंत्राट संपले होते तरी देखील होर्डिंग उभे होते. दरम्यान होर्डिंगचा कंत्राटदार बंकांपुरे आणि होर्डिंग कापणारे कर्माचारी अजूनही फरार असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दोन जणांना याआधी अटक

५ ऑक्टोबरला पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळच्या जुना बाजार परिसरातील होर्डिंगचा खांब कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला होता तर ७ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमध्ये परिसरामध्ये उभ्या असलेल्या रिक्षांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासानासाने होर्डिंग लावणारी जाहिरात एजन्सी याला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. मात्र, ज्या कंपनीकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा ठेका होता त्यांनी मध्य रेल्वेलाच याप्रकरणी दोषी ठरवलं होते. होर्डिंगला आधार देण्यासाठी बसवण्यात आलेले अँगल कापल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले होते. याप्रकरणी ६ ऑक्टोबरला पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोन व्यक्तिंना अटक करण्यात आले होते.

नेमकं काय घडले होते

होर्डिंगचा मोठा लोखंडी खांब, खाली उभ्या असलेल्या रिक्षांवर कोसळला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले होते. श्यामराव धोत्रे (४८), भीमराव कासार (७०), शिवाजी देविदास परदेशी (४०) आणि जावेद मिसबाऊद्दीन खान (४९) अशी घटनेतील मृतांची नावं आहेत. दरम्यान सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा, रेल्वे प्रशासनाने केली आहे. याशिवाय दुर्घटनेत गंभीर जखमीं झालेल्यांना प्रत्येकी १ लाख, तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याचंही रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या – 

पुण्यात होर्डिंगचा खांब कोसळला; ४ ठार, ११ जखमी

पुणे होर्डिंग दुर्घटना: काल आईचे निधन, आज वडिलांवरही काळाचा घाला

पुणे होर्डिंग दुर्घटना: दोन जणांना अटक

होर्डिंग दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्यावी