H3N2 एन्फ्लुएन्झामुळे पुण्यात एका रुग्णाचा मृत्यू, राज्यातील तिसऱ्या मृत्यूची नोंद

H3N2 Influenza
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : राज्यात कोरोनाची लाट ओसरली असतानाच H3N2 एन्फ्लुएन्झा या नवीन विषाणुने डोके वर काढले आहे. एन्फ्लुएन्झाचा महाराष्ट्रात उद्रेक झाला असून या विषाणुमुळे पिंपरी चिंचवडमध्ये आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये H3N2 एन्फ्लुएन्झा बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील H3N2 एन्फ्लुएन्झा बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 एन्फ्लुएन्झा विषाणुची लागन झालेल्या ७३ वर्षीय एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा वृद्ध अनेक आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत समोर आली आहे. तसेच शहरातील आणखी चार व्यक्तींना H3N2 एन्फ्लुएन्झा विषाणुची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आली असून या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

कोरोनासोबतच H3N2 एन्फ्लुएन्झा विषाणुची लागण
अहमदनगरमध्ये H3N2 एन्फ्लुएन्झा विषाणुसह कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र तपासणीदरम्यान त्याला H3N2 एन्फ्लुएन्झा विषाणुची देखील लागन झाल्याचे समोर आले होते.

काळजी करण्याची गरज नाही – आरोग्यमंत्री
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, महाराष्ट्रात आतापर्यंत ३५२ रुग्णांना H3N2 इन्फ्लुएन्झा झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. H3N2 इन्फ्लुएन्झा धोकादायक नसल्याचे सांगत काळजी करण्याची गरज नाही, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. नागपूरमध्ये संशयित H3N2 इन्फ्लूएन्झा विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर अहमदनगर जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. 13 मार्चपर्यंत महाराष्ट्रात 2,56,424 रुग्णांची इन्फ्लूएन्झा तपासणी करण्यात आली आहे. यापैकी संशयित रुग्णांची संख्या १४०६ इतकी आहे. यामध्ये स्वाइन फ्लू विषाणू H1N1 ग्रस्त रुग्णांची संख्या 303, तर H3N2 ग्रस्त रुग्णांची संख्या 58 होती. 48 रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.