कांदा निर्यातशुल्क वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारचा निषेध नोंदवत जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात आले. कांदा निर्यातीसाठी शेतकर्यांच्या उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये हजारो क्विंटल कांदा साठवलेला आहे. निर्यातमूल्य वाढल्याने महागाचा कांदा इतर देश खरेदी कसे करणार, असा सवाल व्यापारी वर्गाने केला आहे. लिलाव बंदमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रतीदिन होणारे ६० ते ७० हजार क्विंटल कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. दुसरीकडे देशांतर्गत गरज भागविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी त्याचे समर्थन केले. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हाधिकार्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला. मंगळवारी (दि.२२) कांदा व्यापार्यांची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकार्यांनी बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लिलाव बंद पडल्याने हजारो कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
नाशिक : कांद्यावरील निर्यातशुल्क वाढविण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर राज्यभरात कांदा प्रश्न पेटला असून, कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमधे कांदालिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा लिलाव बंद राहिल्यास हा प्रश्न अधिक चिघळू शकतो. यासंदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हाधिकार्यांकडून सोमवारी आढावा घेतला. तसेच, यासंदर्भात व्यापार्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.२२) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.
कांदा व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार सध्या कंटेनरमध्ये पडून असलेला कांदा हा निर्यातशुल्क वाढीचा निर्णय होण्यापूर्वीचा आहे. त्यावर आता वाढीव ४० टक्के निर्यातशुल्क लावले तर विदेशात तो कोण घेणार? तो कांदा माघारी घेतला आणि स्थानिक बाजारात आणला तर स्थानिक आणि निर्यातीसाठी पाठविण्याच्या तयारीत अशा दुहेरी कांद्याचे करायचे काय, असे कांदासंकट निर्माण झाले आहे. मुंबई येथील जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि जानोरी अशा दोन ठिकाणी मिळून ४०० ते ५०० कंटेनर कांदा निर्यातीसाठी प्रावासात आहेत. एका कंटेनरमध्ये ३० हजार किलो याप्रमाणे साधारण बाराशे ते दीड हजार मे. टन कांद्याचे व्यवहार अडचणीत येणार म्हणून त्रस्त कांदा व्यवसायिकांनी स्थानिक बाजार समित्यातील खरेदी थांबवली आहे.
दरम्यान, याप्रश्नी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काही कांदा व्यापार्यांनी गार्हाणे मांडल्याने मुंडे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा करत यात मार्ग काढण्याच्या सूचना केल्याने मंगळवारी (ता २२) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती
- ऑगस्ट २०२२ सुमारे २ हजार हेक्टर कांदा लागवड
- ऑगस्ट २०२३ सुमारे ८०० हेक्टर कांदा लागवड
- गतवर्षीच्या तुलनेत १२०० हेक्टर क्षेत्र घटले.
- जिल्हयात खरिप, रब्बी, उन्हाळी या तीन टप्प्यात कांदा उत्पादन होते.
- खरिपाचे क्षेत्र २७ हजार हेक्टर क्षेत्र ३१५० हेक्टरवर कांदा रोपांची निर्मिती
- अवकाळी पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान, परिणामी दर वाढले.