नाशिक : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने लागू केलेले ४० टक्के शुल्क आणि टोमॅटोची दरवाढ रोखण्यासाठी घेतलेला आयातीचा निर्णय याविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मैदानात उतरला आहे. निर्यात शुल्क वाढीचा निर्णय तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. कांदा निर्यात शुल्क ४० टक्के केल्यापासून जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलनाचे सत्र सुरू आहे. (NCP (Sharad Pawar), a roadblock was held on the Nashik-Pune highway. they are Aggressive about onion issue)
निर्यात शुल्क आकारल्याने कांद्याचे देशांतर्गत बाजारात भाव कोसळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यालगतच्या चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला. गळ्यात कांद्याच्या माळा, हाती फलक घेऊन कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांची संख्या मोठी होती.
हेही वाचा : “…तर लायसन्स रदद करणार”; प्रशासनाच्या इशाऱ्याने कांदा प्रश्न अधिक चिघळणार?
आंदोलकांनी रस्त्यात ठिय्या दिल्यामुळे पुण्याहून नाशिकला येणारी वाहतूक ठप्प झाली. मोदी सरकारचा निषेध, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. निर्यात शुल्कामुळे परदेशात जाणारा ५० हजार क्विंटल कांदा रस्त्यात अडकून पडला आहे. कधी नव्हे ते कांद्याला दोन ते अडीच हजार रुपये भाव मिळत होता, तो सरकारच्या निर्णयामुळे हजार ते १२०० रुपयांपर्यंत घसरल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी केला. टोमॅटोला मागील तीन वर्षात भाव नव्हते. शेतकर्यांना मातीमोल भावात ते विकावे लागले.
आता भाववाढ झाल्यानंतर सरकारने परदेशातून टोमॅटो मागवून स्थानिक बाजारातील दर पाडले. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. सरकार दुष्काळ जाहीर करून सवलती देत नाही. या कार्यपध्दतीचा निषेध आंदोलनातून करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. निर्यात शुल्काद्वारे शेतकर्यांवर अन्याय झाला आहे. हे शुल्क रद्द होईपर्यंत आणि टोमॅटोची आयात थांबेपर्यंत जिल्ह्यात अशी आंदोलने सातत्याने करण्याचा इशारा शहराध्यक्ष शेलार यांनी दिला. आंदोलकांमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून हटविल्यानंतर संबंधितांनी रस्त्यालगत ठिय्या देऊन सरकारचा निषेध केला.
हेही वाचा : 40 लाख मे.टन कांदा शिल्लक; 2 लाख मे.टन कांदा खरेदीचा उपयोग काय? अजित नवलेंचा सवाल