कांदा निर्यातीचे ट्विटर वॉर; सुप्रिया सुळे, पीयूष गोयल यांच्यात जुंपली

शेतकरी व ग्राहक दोघेही आंनदी राहत असतील व त्यासाठी काही सुवर्णमध्य काढला जाणार असेल तर आमचे सदैव सहकार्यच राहिल. पण कांद्याच्या निर्यात धोरणात गेली काही वर्षे दिसत असलेल्या धरसोडपणाचा हा परिणाम तर नाही ना याचाही विचार व्हायला हवा, असा टोलाही खासदार सुळे यांनी हाणला.

नवी दिल्लीः कांदा निर्यातीवरून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली. तर अशाप्रकारे कोणतीही बंद नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री गोयल यांनी केला.

केंद्रीय मंत्री गोयल यांनी खुलासा केल्यानंतर खासदार सुळे यांनी पुन्हा ट्वीट करुन त्यांना चांगलेच खडसावले आहे. कांदा प्रश्नाबाबत केलेल्या ट्वीटची दखल घेतल्याबद्दल आपले मनापासून आभार. मात्र यंदा कांद्याचे अधिक उत्पादन झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागत आहे, हे आपल्या निदर्शनास आणून दिले आहे, असे ट्वीट खासदार सुळे यांनी केले आहे.

कांद्याला योग्य दर देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात. जर काही चांगली धोरणे देशपातळीवर अंमलात आणणार असाल तर त्यातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला हवा. ग्राहाकांनाही कांदा वाजवी दरात मिळायला हवा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

शेतकरी व ग्राहक दोघेही आंनदी राहत असतील व त्यासाठी काही सुवर्णमध्य काढला जाणार असेल तर आमचे सदैव सहकार्यच राहिल. पण कांद्याच्या निर्यात धोरणात गेली काही वर्षे दिसत असलेल्या धरसोडपणाचा हा परिणाम तर नाही ना याचाही विचार व्हायला हवा, असा टोलाही खासदार सुळे यांनी हाणला.

कांद्याला भाव मिळत नसल्याने तो रस्त्यावर सोडून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांवर ही वेळ का आली आहे?, असा सवाल खासदार सुळे यांनी ट्वीटमध्ये केला आहे. शेतकऱ्यांचे अश्रु पुसले जातील, अशा उपाय योजना केंद्र सरकारने कराव्यात, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे.