कांदा अग्निडाग समारंभ; कांद्याला भाव मिळत नसल्याने रक्ताने लिहीले मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक : कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अत्यंत कवडीमोल भावात कांदा विकावा लागत असल्याने उत्पादन खर्च भरून निघणेही कठीण बनले आहे. अशातच नाशिकच्या शेतकरयाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहत अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव पुन्हा पडले असून दोनच दिवसांपूर्वी याबाबत शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. सततच्या घसरत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. तीन दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यामध्ये शेतकर्‍यांचा उद्रेक बघायला मिळालेला होता. शेतकर्‍यांनी बाजार समितीमध्ये लिलाव संपूर्णपणे बंद पडलेले होते. त्यानंतरही कुठल्याही स्वरूपाची सरकारने दखल घेतली नाही. येवल्याच्या नगरसुल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले असून कांदा अग्निडाग समारंभ आयोजित करून मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले आहे.

येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे याने कांदा अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. याची निमंत्रणपत्रिका मुख्यमंत्र्यांच्या नावे व्हायरल होत असून पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले आहे की, शेतकर्‍यांपुढे अनेक प्रश्न असताना त्याला कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. आपण शेतकर्‍याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही गप्प का? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे विचारला आहे. आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे. विशेष म्हणजे काही वर्षापुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा डोंगरे यांनी कांद्याचे शेत जाळून टाकलं होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नगरसुल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती.