घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनिर्यातदार देश आर्थिक अडचणीत आल्यानेच कांदा गडगडला : डॉ. भारती पवार

निर्यातदार देश आर्थिक अडचणीत आल्यानेच कांदा गडगडला : डॉ. भारती पवार

Subscribe

नाशिक : कांद्याचे दर घसरल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, निर्यातदार देशांमध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती तसेच काही देशांमध्ये असलेली आर्थिक कोंडी यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी घटल्याचे केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

नाशिकमध्ये काद्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. नाशिकच्या कांद्याला देशांतर्गत तसेच परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, सध्या नाशिकच्या बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, कांद्याला अवघा ६०० ते ७०० रूपये भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च भरून काढणेही अवघड झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळेच नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला असून, शेतकर्‍यांना अक्षरशः कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. याबाबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, यंदा कांद्याचे उत्पादन मोठया प्रमाणावर झाले आहे. परंतु, हा कांदा कमी टिकतो. त्यामुळे कांद्याला मागणी कमी आहे. नाशिकमधून ज्या देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो त्या देशांमध्ये असलेली युध्दजन्य परिस्थिती, तर बांग्लादेश, पाकिस्तानसारख्या देशांची झालेली आर्थिक कोंडी यामुळे या देशांकडून यंदा कांद्याला मागणी नाही असे स्पष्टीकरण डॉ. भारती पवार यांनी दिले.

सर्व परिस्थिती बघता केंद्रिय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहित नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात येऊन कांद्याला योग्य तो भाव देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. गेल्यावर्षी नाफेडने दीड लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली होती. यंदा अडीच लाख मे. टन कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी लवकरच गोयल यांची भेट घेणार आहे. : डॉ. भारती पवार, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -