अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता आणखी सोपी, शासनाने केले महत्त्वाचे बदल

नव्या बदलानुसार विद्यार्थ्यांना सगळ्या फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळेल, फक्त त्यासाठी प्रत्येक फेरीवेळी विद्यार्थ्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत किचकट समजली जाते. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या प्रक्रियेत बराच गोंधळ उडतो. प्राधान्यक्रमाने कॉलेज नाही मिळाले की विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. मात्र, आता विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळू शकते. कारण, यावेळेस प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार, तुम्हाला सगळ्या फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळेल, फक्त त्यासाठी प्रत्येक फेरीवेळी विद्यार्थ्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे. (Online Admission Process for Eleventh standard Now Simplified, Significant Changes Made by the Government)

हेही वाचा – अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यास 30 मेपासून होणार सुरुवात

समजा, विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पसंतीचे कॉलेज मिळाले आणि विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमध्ये प्रवेश घतेला नाही तर, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. पूर्वी अशा वेळी विद्यार्थ्यांना उर्वरिंत फेऱ्यांमध्ये बाद केलं जायचं. मात्र, आता पहिल्या फेरीत पसंतीचे कॉलेज लागल्यावर पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार नाही. मात्र, विद्यार्थ्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यानंतर येणाऱ्या फेरीत विद्यार्थ्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज मिळू शकेल.

विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अडचणी येऊ नयेत याकरता शासनाने हा नवा बदल केला आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया सुटसुटीत झाली असून विद्यार्थी सहज अॅडमिशन घेऊ शकतील.

दरम्यान, राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. या प्रवेश प्रक्रियेला 30 मेपासून सुरुवात झाली आहे. https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे.