गणेशोत्सवासाठी १२ हजारांपैकी फक्त २,२२० मंडळांना परवानगी, तर ४७४ मंडळांचे अर्ज फेटाळले

यंदा ३१ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. मुंबईत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मुंबईत १२ हजार लहान – मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणीकरिता पालिकेकडून अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र यंदा पालिकेकडे प्राप्त झालेल्या व छाननी अंती प्राप्त अर्जांची संख्या ३,४८७ एवढी आहे. त्यापैकी २,२२० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

५६२ दुबार अर्ज असून ४७४ अर्ज विविध कारणास्तव फेटाळण्यात आले आहेत. तर २३१ अर्ज हे प्रक्रियेत आहेत. पालिकेने मंडप उभारणीसाठी दिलेली मुदत दोन दिवसांपूर्वीच संपली होती. मात्र पालिकेने गणेश मंडळांच्या मागणीवरून दोन दिवस मुदत वाढविण्यात आली होती. ही मुदत आज म्हणजे शुक्रवारी संपुष्टात आली. त्यामुळे आता उर्वरित मंडळांना पालिकेची परवानगी कधी व कशी मिळणार, अशी शंका उपस्थित झाली आहे.

२३ ऑगस्टपर्यंत ३,२५५ मंडळांच्या अर्जापैकी १,९४७ मंडळांना परवानगी देण्यात आली होती. मात्र अटी व शर्ती यांची प्रतिपूर्ती करण्यात काही त्रुटी राहिल्याने व अन्य कारणास्तव ४१५ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. तर ५२३ दुबार अर्ज होते.

मुंबईत गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यामुळे लावलेल्या टाळेबंदीमुळे गणेशोत्सव व इतर सण आणि उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले व हटवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना व गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.


हेही वाचा : मुंबई पालिकेकडून गणेशोत्सवासाठी १,९४७ मंडळांना परवानगी, तर ४१५ मंडळांचे अर्ज