घरCORONA UPDATEपरीक्षांसाठी एकच सूत्र हवे - मुख्यमंत्री

परीक्षांसाठी एकच सूत्र हवे – मुख्यमंत्री

Subscribe

कोरोना संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी व्यक्त केली. कोरोना संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेविषयी गोंधळाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी परीक्षेचा मुद्दा उपस्थित केला.

राज्य सरकार लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत नाही. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुण निश्चिती करण्याचा फॉर्म्युला तयार करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा रीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी देखील असेल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.  आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे. महाराष्ट्राने “मिशन बिगीन अगेन”मधून कशी झेप घेतली आहे ते सांगायचे आहे, असे ठामपणे सांगत उद्धव ठाकरे यांनी अल्पावधीतच राज्याने उचललेल्या पावलांविषयी प्रभावी सादरीकरण केले.

- Advertisement -

गेल्या दोन अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असताना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे, असे ठाकरे म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभी पंतप्रधानांनी लडाख येथे धुमश्चक्रीच्या घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सीमेबाहेरील संकटाचाही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे मुकाबला करू, असा विश्वास व्यक्त केला.

‘चेस दि व्हायरसला’ प्राधान्य

महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत राज्यभर सुमारे ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत. यावेळी ठाकरे यांनी आज लोकार्पण झालेल्या बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाची तसेच नेस्को येथील कोविड रुग्णालयाची छायाचित्रेही पंतप्रधानांना दाखवली. ‘चेस दि व्हायरस’ ला संपूर्ण प्राधान्य दिले असून चाचण्या करणे आणि व्यक्तींचे संपर्क शोधणे वाढविले आहे. यामुळे धारावीसारख्या भागातही आम्ही संक्रमण रोखल्याचे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्याकडे पीपीई किट्स, एन ९५ मास्कची उपलब्धता आहे मात्र विशेषत: ग्रामीण भागासाठी व्हेंटीलेटर्सची गरज भासणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाशी मुकाबला करताना निश्चित उपचार नाहीत. मात्र विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मांडल्या मागण्या

* कोरोनावरील औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी.

* शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत.

* प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने कालावधी वाढवून मिळावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -