घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुक्त विद्यापीठाने ७ हजार विद्यार्थ्यांना नक्षलग्रस्त होण्यापासून परावृत्त केल

मुक्त विद्यापीठाने ७ हजार विद्यार्थ्यांना नक्षलग्रस्त होण्यापासून परावृत्त केल

Subscribe

पोलीस स्टेशनमध्येच भरते शाळा

किरण कवडे । नाशिक

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 10 पोलीस स्टेशनमध्ये आजही शाळा भरते. गेल्या चार वर्षांपासून सात हजार विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमधून शिक्षण घेत बी. ए. व बी. कॉम ही पदवी मिळवली आहे. शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील करुन मुक्त विद्यापीठाने एक प्रकारे त्यांना नक्षलग्रस्त होण्यापासूनच रोखले आहे.

ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, आदिवासी विकास विभाग आणि पोलीस अधिकार्‍यांच्या मदतीने नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी हे दर रविवारी पोलीस स्टेशनमध्ये येतात. आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम पोलीस करतात. तर मुक्त विद्यापीठ त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देते. आदिवासी विकास विभाग या सर्व विद्यार्थ्यांचा आर्थिक भार उचलते. त्यामुळे तीन वेगवेगळ्या विभागांच्या सहयोगाने 2018 पासून हा उपक्रम राबवला जात आहे. तत्कालिन कुलगुरु ई. वायूनंदन यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. तसेच मुक्त विद्यापीठातील कुलसचिव प्रकाश देशमुख, सहयोग आणि विशेष उपक्रम प्रमुख प्रकाश अतकारे, सहयोगी सल्लागार कैलास मोरे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी व गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक राजेश गेडाम, गोंदियाचे पोलीस अधीक्षक राजेश गौतम यांनीही त्यास परवानगी दिल्यानंतर 2018 पासून दोन्ही जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्यांमध्ये दर रविवारी शाळा भरु लागली. गडचिरोली जिल्ह्यातील आठ केंद्रांवर 2018 मध्ये 700 तर 2019 मध्ये 1300, 2020 मध्ये 1500 आणि 2021 मध्ये तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्यांना पदवीचे प्रमाणपत्रही वितरीत करण्यात आले. त्यांना नोकरी मिळालेली नसली तरी नक्षलग्रस्त होण्यापासून रोखण्यात मुक्त विद्यापीठाला यश प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

इथे भरते शाळा

गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी, ताडगाव, पेंढरी, ग्यारापत्ती, दामरंचा, शालेकसा, पेंटर, देवरी अशा आठ पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. तर गोंदिया जिल्ह्यातील भरनोली व पिंपरिया या दोन पोलीस ठाण्यांमध्ये आजही शिकवण्याचे काम चालते.

 

मुक्त विद्यापीठाने दुरस्त शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. यात नक्षलग्रस्त भागातील सात हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आम्हाला यश आले. यात विविध विभागांचा तसेच आजी-माजी कुलगुरुंचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची ही गंगा वाहत राहिल. : प्रकाश देशमुख, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ,नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -