घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुंबईला जाणाऱ्या शेकडो टन स्टीलची राजरोस चोरी

मुंबईला जाणाऱ्या शेकडो टन स्टीलची राजरोस चोरी

Subscribe

ट्रक, ट्रेलर थेट मुंबईकडे न जातात वळतात भंगार बाजाराकडे, १०० टनहून अधिक स्टीलची रोज होते चोरी

नाशिक : इमारतीच्या बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या स्टीलची नाशिक जिल्ह्यात सर्रासपणे चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘आपलं महानगर’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून पुढे आला. जिल्ह्यातील दिंडोरी आणि सिन्नर एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टील चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. स्टीलवर प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांमधून दररोज शेकडो टन स्टील ट्रक किंवा ट्रेलरच्या सहाय्याने देशभरातील विविध शहरात निर्यात केले जाते. विशेषत: मुंबईच्या दिशेने मोठया प्रमाणात स्टील पोहचवले जात असते. परंतु, या कंपन्यांमधून मोजमाप करून मुंबईच्या दिशेने निघालेले ट्रक महामार्गाने सरळ मुंबईच्या दिशेने न जाता चक्क भंगार बाजाराकडे वळत असल्याचे ‘आपलं महानगर’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये निदर्शनास आले.

तेथे त्या ट्रेलरचे ‘वजन’ कमी होते आणि त्यानंतर ते ट्रेलर मुंबईच्या दिशेने रवाना होतात. अशा प्रकारची चोरी बांधकाम व्यावसायिकांच्या लक्षातच येत नसल्याने पोलिसांकडे तक्रार द्यायलाही कुणी धजावत नाही. ‘आपलं महानगर’च्या टीमने दिंडोरी येथील एमआयटीसी रोलिंग मिल्स गाठले. तेथून काही ट्रेलर बाहेर पडले आणि आता हे ट्रेलर मुंबई-आग्रा महामार्गावरून सरळ मुंबईच्या दिशेने प्रयाण करतील असे वाटत असतानाच गरवारे पॉईंट येथून त्या ट्रेलरने उजवीकडे वळण घेऊन सरळ एक्सलो पॉईंट आणि तिथून भंगार बाजारात असलेल्या खाणीकडे प्रयाण केले. याच खाणींच्या भागात काही काळ थांबल्यावर आमच्या नजरेस पडले की, या ठिकाणी सायंकाळच्या वेळी तब्बल ५० ते ६० ट्रेलर येतात. ते दिंडोरीच नव्हे तर सिन्नर मधूनही मोठ्या संख्येने या भंगार बाजारातील खाणींच्या भागात येतात.

- Advertisement -

या प्रत्येक ट्रेलरमधून तब्बल १ ते २ टन स्टील उतरवले जाते. या स्टीलच्या बदल्यात त्या ट्रेलर चालकाला त्याचा हिस्सा देऊन रवाना केले जाते. प्रत्येक ट्रेलर मधून १ ते २ टन स्टिल उतवले जाते. अश्या पद्धतीने या खाणींच्या भागात दररोज किमान ५० ते ६० पेक्षा अधिक ट्रेलरच्या माध्यमातून जवळ जवळ १०० टनाहुन अधिक स्टीलची चोरी केली जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

जाब विचारण्याच्या अंगावर ट्रेलर

याबाबत अनेकदा स्थानिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन, तक्रारी करूनही राजरोस चालणार्‍या या गोरखधंद्यावर कोणतीही कारवाई होत नाही हे फार मोठे आश्चर्यच आहे. उलट जेव्हा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, स्थानिक भूमिपुत्र नागरिकांनी या मोठ्या ट्रेलरमुळे अपघात घडल्यानंतर जेव्हा याबाबत जाब विचारला तर त्यांच्या अंगावरच ट्रेलर घालण्यापर्यंत या स्टील माफियांची मजल गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

- Advertisement -

सरकारचीही फसवणूक!

अश्या पद्धतीने चोरी केलल्या स्टीलची खुल्या बाजारात विक्रीच होऊ शकत नाही. कारण त्यासाठी रीतसर बिल हवे. जीएसटी, व्हॅट भरलेला असावा. परंतु हे स्टील माफिया या सगळ्याला फाटा देत आपल्या दुकानात कुठलीही बिल, व्हॅट, जीएसटी शिवाय हे स्टील काळाबाजार करून राजरोस विक्री करतो. यातून सरकारच्या कराचे मोठे नुकसान होत असून ही सरळ सरळ फसवणूक असल्याचे स्पष्ट होते.

मानपाडाला अशाच टोळीचा पर्दाफाश

इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील चोरी करून बांधकाम व्यावसायिक आणि स्टील व्यापार्‍यांची फसवणूक करणार्‍या टोळीचा मानपाडा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील ७ आरोपींना बेड्या ठोकत २ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामाचे प्रोजेक्ट सुरू असून या बांधकामासाठी लागणारे स्टील रायगड जालना व अमरावती परिसरातून येत असते. या स्टीलची चोरी करून बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक होत असल्याचा गुन्हा गेल्या काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस स्थानकात दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या आरोपींकडून मालवाहू ट्रक, स्टील, इलेक्ट्रॉनिक चिप, रिमोट, मोबाईल फोन असा एकंदरीत २ कोटी ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चिप बनवणार्‍या मुख्य आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -