शेतकऱ्यांच्या ‘जात’प्रश्नी सभागृहात विरोधक आक्रमक; राज्य सरकारचं केंद्राकडे बोट

Maharashtra Assembly Budget 2023 | खत खरेदी करताना दुकानदारांकडून जात विचारली जात असल्याची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त केली. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजात विरोधी पक्षांनी हा मुद्दा सभागृहात उचलून धरला. याबाबत आपण केंद्राला विचारणा केली असल्याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वने, मस्त्य आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

sudhir mungantiwar

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशिनवर आता आता जात सांगावी लागत आहे. ई-पॉस सॉफ्टवेअरमध्ये अपडेट आल्यामुळे जात विचारली जात आहे. त्यामुळे खत खरेदी करताना दुकानदारांकडून जात विचारली जात असल्याची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त केली. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजात विरोधी पक्षांनी हा मुद्दा सभागृहात उचलून धरला. याबाबत आपण केंद्राला विचारणा केली असल्याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वने, मस्त्य आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शेतकऱ्यांना रासायिक खते खरेदी करण्याकरता ई-पॉस मशिनमध्ये नोंदणी करावी लागते. या मशिनमध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या आदी माहिती द्यावी लागते. त्यानंतर, पॉस मशिनवर शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन खत दिले जाते. मात्र, तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिनमध्ये अपडेट आले. या अपडेटनुसार मशिनमध्ये शेतकऱ्याला जातीचीही नोंदणी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नेत्यांनीही याविरोधात संताप व्यक्त केला.

हेही वाचा – शाळकरी मुलींना अवघ्या १ रुपयात मिळणार सॅनिटरी नॅपकिन, राज्य सरकारचा मोठा निर्णय

याप्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न मांडला. शेतकरी हीच आमची जात आहे. आपल्या पोटाला जात नसते, मग खत खरेदी करताना जात विचारण्याची गरज काय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ई-पॉस मशिनमध्ये केंद्र सरकारकडून अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून केंद्राला याबाबत विचारणा करण्यात आली आहे. जर, याबाबत चूक झाली असेल तर ती चूक सुधारली जाईल, असं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना राईचा पर्वत करत असल्याचं म्हटलं. यावरून सभागृहात गोंधळ झाला. नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवारांविरोधात संताप व्यक्त केला. अखेर हा गोंधळ थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्ती करावी लागली. शेतकऱ्यांबाबत आम्ही काल सकारात्मक निर्णय घेतल्याने विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे, त्यांच्याकडे आता काही उरलं नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – आता उन्हाळ कांदाही रडवणार?; गतवर्षीच्या तुलनेत “इतके’ लाख मेट्रिक-टन उत्पादनवाढीचा अंदाज