विरोधी पक्षनेते अजित पवार अॅक्शन मोडवर, बचावकार्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश

बचाव व मदतकार्यासाठी प्रशासन व शासकीय यंत्रणाना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

ajit pawar

अतिवृष्टीकाळात नागरिकांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावे, शिवाय बचाव व मदतकार्यासाठी प्रशासन व शासकीय यंत्रणाना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. (Opposition leader Ajit Pawar on action mode, orders workers to come to the rescue)

भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा असेही अजित पवार यांनी आवाहन केले आहे.


जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत.