घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे सहपरिवार तिर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले - विखे पाटील

उद्धव ठाकरे सहपरिवार तिर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले – विखे पाटील

Subscribe

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अयोध्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. अयोध्येत नदी काठी कागदाच्या होड्या सापडल्या आहेत. या होड्या म्हणजेच शिवसेना नेत्यांचे राजीनामे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर काही कागदी होड्या सापडल्या आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आरती झाल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयूमध्ये प्रवाहित केल्या आणि त्याच होड्या आज सकाळी नागरिकांना सापडल्याची माहिती असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले होते, निर्लज्जांनो राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? त्यामुळे अयोध्येला गेल्यानंतर ते आता राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभच केल्याशिवाय मुंबईला परत येणार नाहीत, असाच अनेकांचा समज झाला होता. पण ते तर केवळ सहकुटूंब-सहपरिवार तिर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले आहे.

राम मंदिर केव्हा बांधणार

अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरेंनी मंदिर बांधण्याचा विधानावरून घुमजाव केल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला. मंदिर बांधण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी केंद्र सरकारलाच प्रश्न विचारला की, राम मंदिर केव्हा बांधणार त्याची तारीख सांगा. अयोध्येत जाऊन शिवसेना पक्षप्रमुखांनी मी कुंभकर्णाला जागे करायला आल्याचे सांगितले. पण ते नेमके कोणाला कुंभकर्ण म्हणत आहेत? ते सरकारला कुंभकर्ण म्हणत असतील तर केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. ते स्वतः सत्तेत असताना सरकारला कसे जागे करणार आहेत?अशी प्रश्नांची सरबत्तीही विखे पाटील यांनी यावेळी केली.

- Advertisement -

पहले सरकार,फिर मंदिर

‘पहले मंदिर, फिर सरकार’ या शिवसेनेच्या नाऱ्याचाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, प्रत्यक्षात ‘पहले सरकार,फिर मंदिर’ अशीच शिवसेनेची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे शिवसेनेचा एक स्टंट आहे. स्टंट करण्यात आपणही भाजपपेक्षा मागे नाही, हे सिद्ध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. जपानच्या पंतप्रधानांसोबत मोदींनी गंगाघाटावर केली, तशीच आरती शरयूच्या तिरावर झाली पाहिजे, हा अट्टाहास उद्धव ठाकरेंनी या निमित्ताने पूर्ण करून घेतला.

शिवसेनेची विश्वासार्हता आता संपली

आज महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत. दुष्काळाने राज्य होरपळून निघाले आहेत. लोक गाव सोडून स्थलांतर करीत आहेत. जनावारांना द्यायला चारा-पाणी नाही. शेतकरी स्वतःची चिता रचून आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थिती लोकांना दिलासा देण्याऐवजी इव्हेंट करणे हा जनतेचा विश्वासघात असल्याचे विखे पाटील म्हणाले. शिवसेनेची विश्वासार्हता आता संपली आहे. ते शेवटचा श्वास घेत आहेत. म्हणून त्यांनी राम-राम करायला लागले आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ही शेवटची धडपड आहे, अशीही टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -