(Opposition Leader) मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन होण्यापासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप याचा घोळ अनेक दिवस सुरूच राहिला. त्यानंतर दोन पालकमंत्रिपदांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून विरोधकांनी महायुतीला टीकेचे लक्ष्य केले आहे. मात्र असे असले तरी, विरोधी पक्षनेतेपदाचा पेच महाविकास आघाडी अद्याप सोडवू शकलेली नाही. विशेषत:, विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या पदावर दावा असला तरी, त्यासाठी कोणाची निवड करायची, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या पदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
राज्यामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होऊन 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने भरघोस विजय मिळवून महाविकास आघाडीचे पानिपत केले. तरीही, सरकार स्थापन करण्यासाठी 5 डिसेंबर 2024चा मुहूर्त महायुतीला मिळाला. त्यानंतर 10 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि त्याच्या सहा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकवाक्यता होत नसल्याने पालकमंत्रिपदाची यादीही 18 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आली, पण लगेच दुसऱ्या दिवशी त्यातील नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली.
यावरून विरोधकांकडून महायुतीवर टीकास्त्र सोडले जात असले तरी, महाविकास आघाडीची स्थिती याहून वेगळी नाही. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या. त्यातही समाजवादी पार्टी (2), माकपा (1) आणि एमआयएम (1) यांची साथ ध्यानी घेता, महाविकास आघाडीचे संख्याबळ जवळपास 50 आहे. विरोधी पक्षनेतेपदाची माळ ठाकरे गटाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट आहे. तथापि, महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडून या पदासाठी प्रस्ताव आलेला नाही. प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वीच मांडलेली आहे.
सर्वाधिक आमदार असलेल्या ठाकरे गटाकडे हे पद जाण्याची दाट शक्यता असली तरी यासाठी कोणाची निवड करायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तब्बल सातव्यांदा आमदार झालेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्याकडे विधानसभेच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय, तीन टर्म आमदार असलेल्या सुनील प्रभू यांच्याकडील मुख्य प्रतोदपद कायम ठेवण्यात आले आहे. तर, आताची दुसरी टर्म असलेल्या आदित्य ठाकरे यांची विधिमंडळांच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी या तिघांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल भास्कर जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय. मंत्रिपद मिळेल असे वाटले होते, पण न मिळाल्यामुळे मलाही आश्चर्य वाटले आहे. उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.
त्यातच, विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असताना विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या हाती आहेत. आता त्यांच्या सदस्यत्वाची मुदत येत्या ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचाही दावा आहे. नाना पटोले यांनी अलीकडेच यासंदर्भात पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती, असे समजते. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद तिन्ही पक्षांमध्ये वाटून घेण्याच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा झाली आणि त्याला शरद पवार यांनी हिरवा सिग्नल दिल्याचे सांगण्यात येते.
तिन्ही पक्षांना संधी
विरोधी पक्षनेतेपदासाठी नेता निवडण्याचे सर्वाधिकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि एनसीपी एसपीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे आहेत. विधानसभेचा इतिहास लक्षात घेता, ठाकरे गट, काँग्रेस आणि एनसीपी एसपी या तिघांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी 2-2-1 या फॉर्म्युल्याचा अवलंब करावा, असे काही आमदारांचे म्हणणे आहे. म्हणजेच, ठाकरे गटाकडे सुरुवातीची दोन वर्षे, काँग्रेसकडे नंतरची दोन वर्षे तर, एनसीपी एसपीकडे शेवटचे वर्ष असे हे पद देण्याचे प्रस्तावित आहे.
हेही वाचा – आधी लाडक्या बहिणी अपात्र, आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार; वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल
काँग्रेस आणि एनसीपी एसपीकडून कोण?
ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांवरून घोळ सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी, काँग्रेस आणि एनसीपी एसपी या दोन पक्षांकडूनही कोणाचे नाव असेल याचीही चर्चा आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे. शिवाय, एनसीपी एसपीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांची नावे आघाडीवर आहेत.
पाच वर्षांत चार विरोधी पक्षनेतेपदाचा इतिहास
राज्यामध्ये 1985 ते 1990 या कालावधीत, कमी संख्या असलेल्या जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या तब्बल चौघांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते. या निवडणुकीत 161 जागा जिंकून काँग्रेस सत्तेवर आली. त्यावेळी काँग्रेस (एस)चे नेते शरद पवार विरोधी पक्ष नेते होते. मात्र, त्यांनी 1986मध्ये शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर जनता पार्टीचे निहाल अहमद (14 डिसेंबर 1986 ते 26 नोव्हेंबर 1987), शेकापचे दत्ता पाटील (27 नोव्हेंबर 1987 ते 22 डिसेंबर 1988), जनता पार्टीच्याच मृणाल गोरे (23 डिसेंबर 1988 ते 19 ऑक्टोबर 1989) तर, त्यानंतर पुन्हा एकदा शेकापचे दत्ता पाटील (20 ऑक्टोबर 1989 ते 3 मार्च 1990) विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळी जनता पार्टीकडे 20 तर, शेकापच्या 13 जागा होत्या, हे उल्लेखनीय. पुण्यामध्ये नाना पटोले यांच्यासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हाच दाखला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Opposition Leader: The name will not be decided by the Thackeray group)
हेही वाचा – Sharad Pawar : पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढवणार? शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया