घरमहाराष्ट्रमुंबईत २४ तासांसाठी पावसाचा ऑरेंज अ‍ॅलर्ट

मुंबईत २४ तासांसाठी पावसाचा ऑरेंज अ‍ॅलर्ट

Subscribe

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर हा मंगळवारी सायंकाळपासूनच सुरू होता. आज बुधवारी सकाळीही पावसाचा जोर दुपारपर्यंत सातत्याने पहायला मिळाला. परिणामी मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पहायला मिळाले; पण दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने अनेक भागांतील पाणी कमी व्हायला सुरुवात झाली. गुरुवारीही मुंबईसह नजीकच्या परिसरात पावसाचा जोर काही भागांत कायम राहील, असा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. मुंबईत जुलै महिन्यातील पहिल्याच १४ दिवसांमध्ये या महिन्यातील १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात ८४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

काय आहे हवामान विभागाचा अ‍ॅलर्ट?

- Advertisement -

मुंबई, ठाणे आणि कोकणातील बर्‍याचशा परिसरामध्ये गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. पुढच्या २४ तासांमध्ये ठाणे, रायगड याठिकाणी अतिशय तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज (ऑरेंज अ‍ॅलर्ट) हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेला आहे. पुढील २४ तासांमध्ये काही भागांत पावसाची तीव्रता कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी पावसाची हजेरी राहील, असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. कोकणातील घाट परिसरात अति तीव्र मुसळधार पाऊस होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मच्छीमारांसाठी धोक्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबईत काल सकाळपासूनच पावसाने जोर धरायला सुरुवात केली होती. सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत वांद्रे, महालक्ष्मी, राम मंदिर यासारख्या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. मुंबई शहरासह उपनगरात झालेल्या अतिवृष्टीमुळे दादर टीटी, एस. व्ही. रोड (अंधेरी), खार सबवे, वांद्रे, चांदिवली जंक्शन यासारख्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचाही मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. पाणी साचल्यामुळेच बेस्टनेही आपल्या बसेसचा मार्ग हा सायनपासून वळवला. तसेच मुंबई पोलिसांनीही नागरिकांना साचलेल्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -