कधी दुचाकी, कधी भरपावसात ट्रकमधून गाठली मुंबई; कैलास पाटलांनी कशीबशी शिंदेंच्या तावडीतून केली सुटका

सोमवारी रात्री मुंबईतील निघून गुजरातच्या सुरतमध्ये ३५ आमदारांसह दाखल झालेले एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले

osmanabad shivsena mla kailas patil escaped from clutches of eknath shinde

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेले याचा घटनाक्रम आता समोर येत आहे. शिंदेनी आममदार डॉ.तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही सोबत नेले आहे. यावेळी उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना इतर आमदारांसोबत वाहनात बसवण्यात आले, मात्र हा बंडखोरीचा प्रकार असल्याची कुनकुन लागताच ते समयसूचकता दाखवत शिंदेंच्या गळातून कसेबसे सुटले. यावेळी गुजरात सीमेपासून म्हणजे मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटरचे अंतर पार करून त्यांनी कशीबशी मुंबई गाठली. यानंतर मातोश्री गाठून त्यांनी आपल्यासोबत घडलेला थरारक प्रसंग पक्षनेतृत्त्वाला सांगितला आहे. यात कधी दुचाकी, तर कधी भरपावसात ते ट्रकमध्ये बसून त्यांनी दहिसरपर्यंत प्रवास केला. (osmanabad shivsena mla kailas patil escaped from clutches of eknath shinde)

समोर आलेल्या माहितीनुसार, उस्मानाबादचे आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे तीन दिवसांपूर्वी रेल्वेने मुंबईला गेले होते. यावेळी सोमवारी त्यांना विधान परिषदेच्या मतदानानंतर साहेबांनी आपल्याला जेवायला बोलवल्याचे सांगत एका खाजगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले. इतर सहकारी आमदारांच्या सांगण्यावरून ते गाडीत बसले. मात्र गाडी ठाण्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर पोहचल्याने त्यांना आपली दिशाभूल होत असल्याचे जाणवले. त्यामुळे अस्वस्थता वाढत गेली. गुजरातच्या सीमेवर पोहचल्यानंतर अंधारात वाहनांच्या गर्दीतून त्यांनी शिंदेंच्या हातावर तुरी देऊन गाडीतून सुटका करुन घेतली.

लघुशंकेला थांबायचं असल्याचे सांगत त्यांनी आपली सुटका करुन घेतली आहे. यावेळी रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून त्यांनी उलट्या दिशेने म्हणजे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. यावेळी महाराष्ट्र बॉर्डर जवळील ठिकाणाहून ते रात्री भर पावसात 4 किमी पायी चालत आहे. यावेळी एका दुचाकी चालकाला विनंती करत काही किलोमीटर अंतर त्यांनी पार केले, यानंतर एका ट्रक चालकाला थांबवून त्यांनी दहिसरपर्यंत कसाबसा प्रवास केला. यावेळी दहिसरपर्यंत आल्यावर त्यांनी पक्षातील अन्य सहकाऱ्यांना माहिती देताच त्यांना नेण्यासाठी गाडी पाठवण्यात आली. अशाप्रकारे कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली. आमदार पाटील यांनी त्यांच्यासोबत घडलेला थरारक अनुभव खासदार संजय राऊत यांना सांगितला.

दरम्यान आमदार कैलास पाटील हे शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडणून आले. त्यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांना शिवसेनेने त्यांच्यावर जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला पाठींबा न देता आणि फितुर न करता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे शिवसेना नेत्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडले असून माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जाणार असा दावा एकनाथ शिंदे यांनी आसाममध्ये केला आहे.

सोमवारी रात्री मुंबईतील निघून गुजरातच्या सुरतमध्ये ३५ आमदारांसह दाखल झालेले एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरताच दोन वेगवेगळ्या बसमधून शिंदे यांच्यासह आमदारांना नेण्यात आले.


गुजरातमध्ये जरुर दांडिया खेळा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्की: सामनातून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल