घरदेश-विदेश...अन्‍यथा लोकल, बस बंद करू

…अन्‍यथा लोकल, बस बंद करू

Subscribe

गर्दी टाळा, काळजी घ्‍या!, लोकल, बस सुरू राहणार, राज्‍यात करोनाचा पहिला बळी!, सरकारी कार्यालये सध्‍या तरी सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबईतील खासगी कंपन्यांच्या मालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ५० टक्के कर्मचार्‍यांकरता ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेण्यासंबंधी सकारात्मकता दर्शवली आहे. हाच फॉर्म्यूला सरकारी कार्यालयांसाठी वापरून किमान मनुष्यबळामध्ये सरकारी कार्यालयांचे कामकाज कसे करता येईल, याविषयी आमचा विचारविनिमय सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकल आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, मात्र नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, गर्दी न ओसरल्यास आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, नाईलाजाने आम्हाला अशी पावले उचलायला लावू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१वर पोहोचली असून त्यातील २६ पुरुष व १४ महिला आहेत, त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला असून करोनामुळे महाराष्ट्रातील हा पहिला मृत्यू आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नागरिकांनी गर्दी टाळावी, काळजी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केल

मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनासंबंधी सविस्तर चर्चा झाली, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील जनतेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनावश्यक प्रवास टाळावा, अन्यथा आम्हाला नाईलाजाने बस, ट्रेन बंद कराव्या लागतील. तसेच सरकारी कर्मचार्‍यांना एक आठवड्याची सुटी दिलेली नाही. तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, मात्र कमीत कमी मनुष्यबळाच्या आधारे सरकारी कामकाज कसे सुरू ठेवता येईल, याविषयी आम्ही विचार करत आहोत. त्याचबरोबर शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील.

- Advertisement -

तसेच इतरही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून व्यापार्‍यांनीही स्वत:हून पुढाकार घेऊन दुकाने बंद करावीत, केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने सुरू ठेवावीत, असे आम्ही आवाहन करत आहोत. सोमवारपासून मुंबईसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे बंद केली जात आहेत. त्याप्रमाणे सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे उदा. गुरुद्वार, चर्च, मशिदीही बंद करण्याचे आवाहन आम्ही करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

सध्या प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया याद्वारे करोनाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याचे सुरू असून जनतेनेही खबरदारी बाळगण्याची गरज आहे. गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना होम क्वारंटाईल होण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याविषयी आजूबाजूला माहिती असावी, त्यांच्यापासून इतरांमध्ये संसर्ग होऊ नये, म्हणून आम्ही संबंधित संशयितांच्या हातावर शिक्का मारत आहोत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच महापालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये आम्ही विलगीकरणाचे विभाग तयार करत आहोत, मात्र ज्यांना या विलगीकरणाच्या विभागांमध्ये रहाण्याची इच्छा नसेल, त्यांच्यासाठी पंतचाराकीत हॉटेलांमध्येही विलगीकरणाचा विभाग तयार करण्यात येईल, त्याचा खर्च मात्र त्यांना स्वत:ला करावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही रोजंदारीवर काम करणार्‍यांसाठी महत्त्वाची असते, म्हणून आम्ही सध्यातरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे म्हणाले.

वर्क फ्रॉम होमसाठी खासगी कंपन्या तयार

करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. गर्दीमुळे हा विषाणू अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा भर आहे. मंगळवारी याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

जवळपास २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या वाहिन्यांवरून करोना विषाणूविषयी जनजागृती करण्यास तयार आहेत असे टोपे म्हणाले. त्याशिवाय सीएसआर फंडातून मास्क, सॅनिटायझर्स आणि आयसोलेशन वॉर्ड उभारणीसाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याची या कंपन्यांनी तयारी दर्शवल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयातील गर्दी बंद केली आहे. बाहेरच्या लोकांना मंत्रालयात येऊ दिले जात नाही. मंत्रालयात गर्दी होऊ नये, कर्मचार्‍यांचीही गर्दी होऊ नये. काही काम थांबवता येतील का हे पाहू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्र्यांनी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोमवारी मंत्रालयात एका कर्मचार्‍याला करोनाचा संशयित म्हणून कस्तूरबा येथे दाखल केले होते, मात्र त्याची तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मंत्रालयातील सर्व कर्मचारी सुरक्षित असणार आहेत, असेही टोपे म्हणाले.

प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० रुपये
मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. करोना विषाणूची दहशत राज्यभरात आहे. मुंबईत लोकल स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आलं आहे. मुंबईतील २०० स्थानकांवर या तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

राज्यातील सर्व स्थानिक निवडणुका स्थगित
स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी जाहीर केले.

पर्यटनाची जलवाहतूक 31 मार्चपर्यंत बंद
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी जलक्रीडा प्रकल्प व नौकाविहार प्रकल्प चालविण्यात येतात. बोर्डाने हे प्रकल्प 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.

एपीएमसी मार्केट २ दिवस राहणार बंद
होलसेल व्यापार्‍यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरून ऑर्डर देण्याचे आवाहन केले आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दररोज ५० हजार लोकांची ये-जा सुरू असते. रोगप्रतिबंधक उपाययोजनांसाठी गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस एपीएमसी बाजारपेठ बंद ठेऊन स्वच्छता करण्यात येणार आहे.

बॉलिवूड कलाकारही घरात झाले बंदिस्त
अभिनेते दिलीप कुमार यांना विलगीकरणात ठेवले. सलमान , हृतिक, सैफ, करिना यांनी घरातच बसणे पसंत केले आहे. अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली.

ताजमहल, लाल किल्ला, शनिवारवाडा बंद
ताजमहल, लाल किल्ला, कुतुबमिनार, स्टॅच्यू ऑफ युनिटीसह महाराष्ट्रातील शनिवारवाडा यांना टाळे लावण्यात आले आहे. ऐतिहासिक स्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद केली आहेत.

लग्न सोहळे पुढे ढकलले
गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करु नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आल्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून अनेकांनी लग्न सोहळेे पुढे ढकलले आहेत.

जर्मनीहून मागवले १० लाख करोना टेस्ट किट
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चाचणीचा वेग आणि निदान करण्याची क्षमता वाढवण्यासाठी जर्मनीहून १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -