घरमहाराष्ट्रनाशिक.. अन्यथा साचलेल्या पाण्यात करणार आंदोलन

.. अन्यथा साचलेल्या पाण्यात करणार आंदोलन

Subscribe

मालेगावमधील सोयगावकर आक्रमक; पावसाळ्यात उद्भवणार्‍या समस्येने हैराण

मालेगाव येथील महानगरपालिकेच्या हद्दीतील सोयगाव प्रभाग क्रमांक १० मधील विष्णूनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. या परिसरात दर पावसाळ्यात पाणी साचून ते घरांमध्ये शिरते. संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. महानगरातील महत्त्वाचा भाग असलेल्या सोयगाव विष्णूनगर परिसरात पावसाळ्यात पाणी साचून रस्ते बंद झाल्याने शहराशी संपर्क तुटतो. विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होते. हेच पाणी पाईपलाईन लिकेजमधून थेट नळांद्वारे येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी स्वतः या भागात पाहणी करावी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, पावसाळी गटारी-आरसीसी नाले बांधावेत आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. याप्रश्नी उपायययोजना न केल्या गेल्यास साचलेल्या पण्यातच आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोयगाव परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. दरवर्षी महानगरपालिका प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करते. विष्णूनगर परिसरात साचलेले पाणी गटारी सेक्शन पंप लावून पाणी उपसले जाते. या परिसरात पावसाळी गटारी निर्माण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. याबाबत समितीने वेळोवेळी पालिका प्रशासनास लेखी व प्रत्यक्ष भेटून तोंडी स्वरूपात निवेदन दिले होते. परंतु प्रशासन पाणी निचरा होण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास धजावत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कोरोना रोगाचा मालेगावात मोठा प्रादुर्भाव वाढला होता, या पार्श्वभूमी परिसरात पाणी साचून हिवताप, मलेरिया, डायरीया वैगरे साथ रोगांची लागण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेची असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

यावर्षीही पावसाळा सुरू झाला असून थोड्या दिवसांत या संपूर्ण परिसरात पावसाचे पाणी जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने आतापासून यावर शाश्वत व कायमस्वरुपी पाणी निचरा होऊ शकेल, पाणी वाहून जाऊ शकेल अशी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या भागात आयुक्तांनी स्वतः भेट देऊन पाहणी करावी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रितेश शर्मा, दिनकर गायकवाड, हर्षल गायकवाड, योगेश शर्मा, नम्रता शर्मा, दीपक जाधव, शालिनी जाधव, रवींद्र विसपुते, अनिता विसपुते, छोटू चव्हाण, शीतल चव्हाण, कौतिक देवरे, सुलोचना देवरे, यशवंत पवार, पुष्पाबाई पवार, वाल्मिक मोरे, छाया मोरे, विनायक पवार, लाराबाई पवार, गोरख राणे, आशाबाई राणे, प्रमोद निकम, माधुरी निकम, शाम कदम, माधुरी कदम आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -