जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषण करत असल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. त्याठिकाणी पोलीस पोहचल्यावर उपस्थितांकडून त्यांना घेरून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. अधिकाऱ्यासह 12 पोलीस त्या दगडफेकीत जखमी झाले. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज करताना कोणी गंभीर जखमी होऊ नये अशाप्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकप्रकारे पोलिसांची बाजू घेत जालना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला? यासंबंधी माहिती दिली. परंतु त्यांच्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले आहे. दरम्यान, उपोषण करणारे मनाजे जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भाजपामधून काढण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील अशी भीतीही व्यक्त केली आहे. (otherwise they would shoot the Marathas to death Jarange Patil demand to remove Fadnavis from BJP)
हेही वाचा – Jalna Lathi Charge : ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते…; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल
जालन्यातील दुर्घटनेनंतर विरोधी पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. पण फडणवीस यांना भाजपाने पक्षात ठेवूच नये. त्यांनी केलेले विधान मराठा विरोधी आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्हाला फडणवीस एक चांगली व्यक्ती वाटायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवच वाटायचे. मात्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांविरुद्ध द्वेष असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपामधील कित्येक मराठा चेहरे नाराज आहेत. मी त्यांची नावे घेणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
…अन्यथा ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील
जरांगे पाटील म्हणाले की, गृहमंत्र्यांसारख्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला असं बोलणं शोभत नाही. ते असं बोलूच कसं शकतात? आम्ही आमच्या जीवावर आंदोलन करत आहोत. कोणी गंगेत हात धुवत नाही. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी काही लोकं याठिकाणी आले, मात्र फडणवीस अजून आलेले नाही. त्यांना भाजपामधून काढून टाका, अन्यथा ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील, अशी भीती जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Maharashtra News : बुलढाण्यातील सभेत मुख्यमंत्री दुष्काळावर बोलले, पण…
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, जालन्यातील घटनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्याची जबाबदारी आहे, उपोषण करताना कोणाची तब्येत खराब होत असेल त्यांना रुग्णालयात तत्काळ दाखल करणे गरजेचे असते. प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती केली. पण दुर्देवाने त्याठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना घेरून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. अधिकाऱ्यासह 12 पोलीस दगडफेकीत जखमी झाले. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज करताना कोणी गंभीर जखमी होऊ नये, अशाप्रकारचा प्रयत्न करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या नसत्या तर पोलीस पथकाला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं, असे फडणवीस म्हणाले होते.