Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ... अन्यथा ९ एप्रिलपासून व्यापारी आपले व्यवसाय सुरू करणार

… अन्यथा ९ एप्रिलपासून व्यापारी आपले व्यवसाय सुरू करणार

महाराष्ट्र चेंबर्सचा राज्य सरकारला इशारा

Related Story

- Advertisement -

‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद करण्यात आल्याने शासनाच्या या भुमिकेबाबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या बैठकित तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हा निर्णय लागू करतांना शासनाने व्यापारी वर्गाला विश्वासात घेतले नाही, अचानक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने ८ एप्रिलपर्यंत या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा ९ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यापारी आपले व्यवसाय सुरू करतील असा इशारा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्यावतीने देण्यात आला.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कामॅर्सची राज्यस्तरीय बैठक मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यावेळी सुरूवातीला चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी बैठकी मागची भुमिका विशद केली. या बैठकीत “ब्रेक द चेन व व्यापार बंद” या विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग रोखणे आवश्यक आहे हे खरे आहे परंतु अर्थचक्र सुरू राहणे आवश्यक असल्याची भुमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडली असतांना थेट अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या निर्णयाबाबत व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कठोर निर्बंधाच्या नावाखाली थेट लॉकडाऊनच करण्यात आले आहे. हा निर्णय घेतांना व्यापारी प्रतिनिधींशी सरकारने चर्चा केलेली नाही. व्यापारी वर्ग देखील शासनाचे सर्व कर भरतात,या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होतो. या निर्णयामुळे दुकानांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे व्यवसाय पुर्णपणे बंद न करता निर्बंध घालून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी यावेळी मांडण्यात आली

- Advertisement -

. दि. ७ व ८ एप्रिल असे दोन दिवस राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सुरु करतील. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा ठराव राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त आशिष पेडणेकर, श्री. विलास शिरोरे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा तसेच राज्याभरातून तीनशे व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ चे धोरण जाहीर केले आहे. परंतु ते व्यापाराला आळा घालणारे धोरण आहे. व्यापार्‍यांना विश्वासात न घेता व्यापार्‍यांच्या विरोधात असा निर्णय घेतल्यामुळे व्यापार्‍यांची अडचण झाली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. निर्बंध लादून व्यापार सुरू करण्यास मुभा द्यावी अशी आमची मागणी आहे. परंतु या मागणीचा विचार न केल्यास ९ एप्रिल पासून व्यापारी आपले व्यवसाय सुरू करतील असा ठराव या बैठकीत करण्यात आला.
संतोष मंडलेचा, अध्यक्ष
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स

- Advertisement -