Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र आमच्या पप्पांनी गणपती आणला..; 'काय' आहे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टे ?

आमच्या पप्पांनी गणपती आणला..; ‘काय’ आहे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टे ?

Subscribe

नाशिक : लाडक्या बाप्पांचे मंगळवारी घरोघरी आगमन होणार आहे. अनेकांनी सोमवारी भर पावसात गणपतीची मूर्ती घरी आणली. विशेष म्हणजे एकीकडे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे कमालीचे व्हायरल झालेले गाणे सुरू असतानाच बाप्पाचे आगमन झाले. गणेशोत्सवासाठी शहरासह जिल्हयातील बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारपेठेत मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी दिसून आलीे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाकडे कल वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तींना मागणी दिसून येत आहे. सोमवारी सकाळापासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाच्या सरी अंगावर झेलत नाशिककरांनी ‘श्रीं’च्या आगमनाची तयारी केली. (aamchya pappa ni Ganpati aanla)

गणपतीसाठी आकर्षक रेडिमेड मखर, झालर, पडदे, लायटिंगच्या माळा, कारंजे, गणेश मूर्ती, कागदी फुले, रंगबेरंगी माळी, कापडी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. तसेच मूर्तीसाठी फेटा, मुकुट, आसन खड्यांचा वापर करून तयार केलेले हार, अशा विविध सजावटीच्या साहित्यासह पूजेच्या साहित्यांनाही मोठी मागणी आहे. शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सराफ बाजार यासह उपनगरांत सर्वत्र सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. मखरींबरोबर मोत्यांचे, कापडी तोरण, वॉल हँगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक आवडीने खरेदी करतांना दिसून आले. गणपती पाठोपाठ गौरींचेही आगमन होत असल्याने गौरीच्या साजशृंगाराच्या साहित्याची बाजारात रेलचेल दिसून येत आहे.

तब्बल ३०० वर्षांनंतर आला अद्भूत योग

- Advertisement -

यंदाच्या गणेशोत्सवात विलक्षण योग जुळून आला आहे. ज्योतिष अभ्यासक अनिल चांदवडकर तसेच रवींद्र बिडवे यांच्या मते, यंदा तब्बल ३०० वर्षांनंतर गणेश चतुर्थी अंगारक योगात आलेली आहे. याच दिवशी ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे शुभ योग दखील असल्याने या चतुर्थीला खास महत्व प्राप्त झाले आहे.

कृत्रिम फुलांचे आकर्षण

शहरातील अनेक चौकांमध्ये तसेच बाजारपेठांमध्ये आर्टिफिशियल फुलांच्या माळांनी दुकाने सजली होती. कानडे मारूती लेन, विश्रामबाग लेन परिसरात कृत्रिम फुलांच्या माळांची बाजारपेठच सजली. या माळांमध्ये वापरलेले रंग आणि त्याची बनावट पाहताच क्षणी ग्राहकांना भुरळ पाडत आहे. या ठिकाणी झेंडूच्या माळा, जास्वंद फुलांच्या माळा, दारावर लावण्यासाठी आंब्याचे, झेंडूचे, चमेली आणि लिली फुलांचे गुलदस्ते, फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी विविध परदेशांतील फुलांचे प्रकार अशा नाना तर्‍हेची रंगीत फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अगदी तीन फुटांच्या माळांपासून 1 ते 5 फुटांच्या माळांपर्यंत झेंडूचे हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रोषणाईने सजले शहर

- Advertisement -

गणेशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण दिसून येत असून शहरातील मोठया मंडळांनी भव्य दिव्य देखावे साकारले आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेपूर्वी पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत देखावे पूर्ण करण्यासाठी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांची लगबग दिसून आली. तर लहान मंडळांनीही तयारीवर अखेरचा हात फिरवला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये गणेश मंडळांच्यावतीने स्वागत कमानी उभारल्या असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस मोठया भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विविध मंडळांच्यावतीने स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

गणेशाची विविध रूपांची मोहिनी

यंदा बाल गणेश रूपातील मूर्तींना विशेष मागणी असल्याने विक्रेत्यांनी सांगितले. यासोबतच शिवरूपी, दगडु शेठ, मूषकारूढ, मोरावरचा गणपती अशा विविध मूर्तीची छाप असून याच मूर्तींना मागणी अधिक आहे.

वाद्य पथकेही सज्ज

‘श्रीं’ ना वाजत गाजत घरी नेण्याची हौस लक्षात घेऊन बारामतीतील अनेक पारंपारिक वाद्य पथकांचे बुकिंग झाले असून हे पथकेही ‘श्रीं’ ना वाजत गाजत घरोघरी व मंडळांमध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

वाहतूकीचा बोजवारा

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गणेशभक्तांची एकच गर्दी उसळली. खरेदीसाठी येणार्‍यांपैकी अनेकजण कार, दुचाकी, ऑटोरिक्षातून येत असल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहतूकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

- Advertisment -