संतापजनक! कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दगडाने ठेचून खून

नाशिक : खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तीन ते चार युवकांनी सामूहिक बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी (दि.२१) सकाळी इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात घडली. या घटनेनंतर आमदार हिरामण खोसकर यांच्या नागरिकांनी घोटी पोलीस ठाण्यात आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीच्या पाण्यात रविवारी (दि.२१) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ४० वर्षीय विवाहित महिला नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी येथे दबा धरून बसलेल्या काही युवकांनी महिलेसोबत झटापटी केली. युवकांनी तिला खोल दरीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला. बराचवेळ झाला तरी विवाहिता घरी का आली नाही हे पाहण्यासाठी काहीजण खदाणी जवळ गेले असता तिचा खून झाल्याचे उघडकीस आले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी एक युवक आढळून आला. नागरिकांनी त्यास घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत तीन ते चार युवक असण्याची शक्यता असून, संशयित युवक फरार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. या घटनेनंतर सायंकाळी शेकडो नागरिकांच्या जमावाने घोटी पोलीस ठाण्यात घेराव घातला. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात दाखल होत संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. या ठिकाणी गावठी दारूचा धंदा सुरू होता. हा दारुचा धंदा बंद करावा, यासाठी खंबाळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी केली होती. मात्र, हा धंदा बंद झाला नाही. यामुळेच ही घटना घडल्याचे जमावाने सांगितले. तसेच घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप खेडकर यांची तातडीने निलंबित करण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त जमावाने केली.

यावेळी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोन ते तीन दिवसांत खेडकर यांची बदली करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी दिले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.