संतापजनक : शुल्लक कारणावरून १२वीच्या विद्यार्थ्याकडून आईची हत्या

पुणे : अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहत असल्यामुळे आई रागवल्याच्या शुल्लक कारणामुळे चिडलेल्या १२ वीच्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज घडला आहे. तसेच या मुलाने स्वत:ला वाचविण्यासाठी आईने आत्महत्या केल्याचा बनवही रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लिम शेख (३७) या पती आणि मुलासह लोणी काळभोर पोलीस स्टेसनच्या हद्दीतील उरळी कांचन भागात राहायला होत्या. तस्लिम शेख यांनी आत्महत्या केली अशी माहिती सुरुवातीला पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेची मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी सुरु केली असता महिलेचा मुलगा जिशनने (१८) हत्या केली असल्याची कबूली दिली.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे बारावीला असलेला जिशनला काही दिवसांपूर्वी अभ्यास करत असताना मोबाईल पाहतो या कारणाने रागावून आईने त्याला मारले होते. याचा राग मनात ठेवून जिशनने त्याच्या आईला आधी भिंतीवर ढकलले आणि नंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली, मात्र रक्त न आल्याने त्याने आईला पंख्याला लटकवले आणि आत्महत्या केली असा बनाव केला होता. पोलिसांनी आरोपी जिशनला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातही अशीच घटना
पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार येथे एका मुलाने आईची हत्या केल्याची घटना घडली होती. घटनेपूर्वी आई आणि मुलामध्ये जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद इतका वाढला की, मुलाने रागाच्या भरात आईचा कपड्याने गळा आवळून हत्या केली. आई आणि मुलामध्ये नेमका कशावरून वाद झाला हे अद्याप स्पष्ट आहे. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विरार येथील २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.