Corona Vaccination: राज्यात ९ कोटींहून अधिक नागरिकांचे पार पडले लसीकरण

over 9 crore covid-19 vaccine doses administered in Maharashtra
Corona Vaccination: राज्यात ९ कोटींहून अधिक नागरिकांचे पार पडले लसीकरण

राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांना आजपर्यंत कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज दिली. राज्यात आज सायंकाळी पाच वाजता नऊ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्याचा टप्पा पार करण्यात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला यश आले. यापैकी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले’ अभियानामध्ये सर्व विभागांच्या अधिकारी-कर्मचारी यांना एकत्रित करुन लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.

सध्या राज्यात २९ हजार ५५५ सक्रिय रुग्ण

दरम्यान राज्यात आज दिवसभरात २ हजार २१९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार १३९ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ८३ हजार ८९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६७० रुग्णांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ११ हजार ७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २९ हजार ५५५ सक्रिय रुग्ण आहेत.


हेही वाचा – ठाकरे सरकारची कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत