घरताज्या घडामोडीजिल्हयात ६०० मेट्रीक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

जिल्हयात ६०० मेट्रीक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

Subscribe

पालकमंत्री भुजबळ ; घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे आदेश

गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा मोठा परिणाम आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी पावले उचलावी लागतील, त्यामुळे जनतेने स्वत:हुन पुढाकार घेण्यासह प्रशासनाने ही मोहीम घरोघरी पोहोचवावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, ११ सप्टेंबर २०२१ रोजी रूग्णसंख्या ९०४ इतकी होती. २३ सप्टेंबर २०२१ रोजी ती १ हजार ३५ झाली. २४ ऑक्टोबरला रूग्णसंख्या ७१७ होती, त्यानंतर ही संख्या ६५० ते ७०० च्या दरम्यान असायची ती कमीकमी होत आज रोजी ४६१ पर्यंत कमी झाली आहे. सण, उत्सवांच्या कालावधीनंतरची ही कमी होणारी आकडेवारी चांगले संकेत देणारी व कोरोनामुक्तीसाठी आशादायक चित्र निर्माण करणारी आहे. अर्थात यांत जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणीकरण होत असलेले लसीकरणाचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात कोरोनापूर्वी ८ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता होती. ती दुसर्‍या लाटेत १३८ ते १४० मेट्रिक टन इतकी झाली, आज ३५६ मेट्रिक टन इतकी आहे. येणार्‍या काही दिवसात ती ६०० मेट्रिक टन इतकी होणार असल्याची माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -