घरमहाराष्ट्रऑक्सिजन साठा संपत आलाय, रुग्णांना अन्यत्र हलवा; रुग्णालयांच्या सूचनेने नातेवाईक धास्तावले

ऑक्सिजन साठा संपत आलाय, रुग्णांना अन्यत्र हलवा; रुग्णालयांच्या सूचनेने नातेवाईक धास्तावले

Subscribe

दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना उपलब्ध सोईसुविधा अपुर्‍या पडत असल्याने यंत्रणा हतबल झाली आहे. त्याचवेळी रुग्णांना खाटा, ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. त्यातच मुंबईतील रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने तुमच्या रुग्णाला तातडीने अन्यत्र स्थलांतरित करा असे रुग्णालयातून सांगण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईक मोठ्या प्रमाणात धास्तावलेले आहेत.

विक्रोळीतील एका खासगी रुग्णालयात कोरोना संक्रमित ५५ वर्षीय मीनाक्षी गुजराथी यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात यावे, असे रुग्णालयाकडून बुधवारी रात्री सांगण्यात आले. त्यानंतर गुजराथी परिवार ९० तासांपासून ऑक्सिजन खाटेसाठी मुंबईत वणवण भटकत आहे. एस वॉर्ड अंतर्गत येत असलेल्या खासगी आणि पालिका रुग्णालयात ऑक्सिजन खाट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. वॉर्ड वॉर रुममध्ये सातत्याने चौकशी करुनही खाट उपलब्ध होत नसल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत असलेल्या मीनाक्षी गुजराथी यांची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत असून, त्यांना आता आयसीयूची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुजराथी कुटुंबाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर खासगी रुग्णालयाकडून रुग्णाला हलवण्याबाबत वारंवार विचारणा करण्यात येत असल्याने ते हताश झाले आहेत.

- Advertisement -

धारावीतील सुकन्या नर हिचे काका धारावी येथील आयुष रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णालयातही ऑक्सिजनची कमतरता असल्याने सुकन्याच्या काकांसहित अन्य सहा रुग्णांना अन्यत्र हलवण्यास रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. सुकन्याने जी/उत्तर विभागाच्या वॉर्ड वॉर रुममध्ये संपर्क केला परंतु आयसीयू खाट रिक्त नसल्याचे सांगण्यात आले. मुलुंडमधील अ‍ॅपेक्स रुग्णालयात दाखल असलेले कोरोना संक्रमित धीरज कामत यांना देखील रुणालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दुसर्‍या रुग्णालयात हलवण्याबाबत रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र खाटा उपलब्ध नसल्याने काय करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे कांदिवलीतील रचित अरोरा याची आई अलका अरोरा यांच्यासाठी शुक्रवारी रात्रभर उपचारासाठी बेड शोधावा लागला. अखेर वरळी येथील एनएससीआई येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. पण शनिवारी सकाळी रचित यांना सेंटर मधून फोन आला की, तुमच्या आईला इतर रुग्णालयात शिफ्ट करा, सेंटरमध्ये ऑक्सिजनचा साठा कमी आहे. रात्री उशीरा रचित याने त्याच्या आईला मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मुंबईत करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन, आयसीयू खाटा, वेंटिलेटरची कमतरता सातत्याने जाणवत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने पालिकासहित खाजगी रुग्णालयातही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने अनेक रुग्णालये रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांच्या मागे तगादा लावत आहेत. मात्र पालिकेच्या डॅशबोर्डवर खाटा उपलब्ध असल्याचे दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात संबंधित रुग्णालयात विचारणा केल्यावर आक्सिजन खाटा किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -