घरमहाराष्ट्रझाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये हाहाःकार

झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये हाहाःकार

Subscribe

ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये बुधवारी (दि. २१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शब्दश: मृत्यूने तांडव केले. दुपारी ऑक्सिजन टाकीला गळती लागल्यामुळे अचानकपणे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे तब्बल २४ रुग्णांचा गुदमरून अंत झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली. यात १२ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या संकटामुळे हॉस्पिटलमध्ये एकच हाहा:कार उडाला. रुग्णांचे नातेवाईक हंबरडा फोडून रडत असल्याचे अत्यंत विदारक चित्र हॉस्पिटलमध्ये पहायला मिळाले.

व्हेंटिलेटरवरील पेशंट दगावण्याचे प्रमाण अधिक 
नातेवाईकांच्या आक्रोशाने परिसर हेलावला
हॉस्पिटलमध्ये १५७ रुग्णांपैकी १३१ जण ऑक्सिजनवर होते 

टाकीला जोडलेल्या पाईपलाईनवरील दाब वाढल्याने दुर्घटना
अत्यवस्थ रुग्णांना तातडीने हलवले खासगी हॉस्पिटलमध्ये
मृतांच्या वारसांना शासन व महापालिकेकडून १० लाख
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मिसळली नागरिकांची गर्दी

- Advertisement -

नाशिक शहरासह संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची प्रचंड चणचण असताना हॉस्पिटलच्या ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला बुधवारी दुपारी १२.२०च्या सुमारास गळती लागली. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात ऑक्सिजनचे पांढरे लोट दिसत होते. याच टाकीतून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. ज्यावेळी गळती सुरू झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर १३१ तर व्हेंटिलेटर लावलेले १५ रुग्ण होते. परंतु, गळतीमुळे अचानकपणे रुग्णांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. परिणामी तब्बल २२ अत्यवस्थ रुग्णांचा दुर्र्दैवी अंत झाला. उर्वरित रुग्णांना तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णांना त्रास सुरू होताच त्यांच्या नातेवाईकांसह डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचार्‍यांची हॉस्पिटलमध्ये एकच धावपळ उडाली.

टाकीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑक्सिजन भरला जात होता. त्याचवेळी टाकीला जोडलेल्या पाईपलाईनमध्ये दाब वाढला. परिणामी पाईपलाईन जोडणारे नोझल तुटले. फुटलेल्या भागातून ऑक्सिजन बाहेर पडू लागला. क्षणार्धात ऑक्सिजनचे पांढरे लोट हॉस्पिटलबाहेर दिसून आले. रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. सुमारे पाऊण तासात गळती थांबवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. पाऊण तासानंतर गळती लागलेल्या नोझलची वेल्डिंग करण्यात आली.

- Advertisement -

महाराष्ट्र शोकमग्न -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक असून मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे’,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

घटना हृदय पिळवटून टाकणारी-मोदी
ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने मन हेलावले. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांचे सांत्वन करताना शब्द अपुरे पडत आहेत. अशा घटना पुन्हा होता कामा नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहीजे. शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

अशा घटनांची पुनरावृत्ती नको-फडणवीस
नाशिकमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. याबाबत सखोल चौकशी होत राहील. मात्र, राज्यात अशी स्थिती पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. आता रुग्णालयात जे रुग्ण आहेत त्यांना योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या रुग्णांना शिफ्ट करायचे असल्यास त्यांना लवकर केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -